जळगाव : शनीपेठ परिसरात सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास भरधाव जाणार्या डंपरने (एम.एच. १९.३४५८) रस्त्यातील विद्युत खांबावरील रोहित्राला धडक दिल्याने रोहित्रामधून आॅईलची गळती सुरू झाली होती. परिसरातील विद्युत पुरवठा साडेचार तास खंडित झाला. तालुक्यातील आव्हाणे गावातील हे डंपर होते.कामानिमित्त डंपरचा चालक शनीपेठ परिसरातील भिलपुरा मशिदीसमोर दुपारच्या सुमारास भरधाव वेगाने जात असताना हा प्रकार घडला. रोहित्राला डंपरचा जोरदार धक्का बसल्यामुळे रोहित्रातून आॅईलची गळती सुरू होऊन विद्युत पुरवठा खंडित झाला होता. ४०० लीटर आॅईलची नासाडी दुपारी २.३० वाजता हा प्रकार घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ क्रॉम्प्टन कंपनीशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. त्यानंतर दुपारी ३ वाजता कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत ४०० लिटरची आॅईलची नासाडी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सांधेदुखीसाठी हे आॅईल गुणकारी असल्याचा समज असल्याने परिसरातील नागरिक रोहित्रातून बाहेर पडणारे आॅईल जमा करण्यासाठी घरातील बादली घेऊन रस्त्यावर उतरल्याचे चित्र येथे बघावयास मिळाले. कालांतराने क्रॉम्प्टन कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आॅईल गळती रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, गळती रोखण्यात येत नसल्यामुळे कर्मचार्यांनी परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करून रोहित्र बसविण्याचे काम सुरू केले होते.
धडकेने रोहित्रातून आॅईल गळती
By admin | Updated: May 20, 2014 01:18 IST