जळगाव -कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार बुधवारी प्रा.के.एफ.पवार यांनी स्वीकारला.
सध्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील यांची नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकपदी निवड झाल्यामुळे या रिक्त झालेल्या पदावर प्रा. के.एफ.पवार यांना संचालक (अतिरिक्त कार्यभार) म्हणून प्रभारी कुलगुरू प्रा.ई.वायुनंदन यांनी नियुक्ती केली आहे.बी.पी.पाटील यांनी संचालक म्हणून १२ नोव्हेंबर २०१८ रोजी पदभार स्वीकारला होता. प्रा.के.एफ.पवार हे विद्यापीठाच्याच गणितीय शास्त्र प्रशाळेत प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. याच विद्यापीठाचे विद्यार्थी राहिलेले प्रा.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ६ विद्यार्थी पीएच.डी. करीत असून त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर २१ शोधनिबंध प्रसिध्द झालेले आहेत. काही संशोधन प्रकल्पदेखील त्यांनी पूर्ण केलेले असून विविध समित्यांवर त्यांनी काम पाहिले आहे.
यांची होती उपस्थिती
बी.पी.पाटील यांच्याकडून बुधवारी प्रा.के.एफ.पवार यांनी पदभार स्वीकारला. त्यावेळी प्रभारी प्र-कुलगुरू प्रा. बी.व्ही.पवार, गणितीयशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा.एस.आर.चौधरी, प्र.वित्त व लेखा अधिकारी एस.आर.गोहिल, उपकुलसचिव ए.सी.मनोरे, के.सी.पाटील, मनोज निळे, के.एन.गिरी, उमवि शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, उमवि मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आणि उमवि शिक्षक व कर्मचारी पतपेढीचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.