लोकमत न्यूज़ नेटवर्क
जळगाव : समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते; मात्र दरवर्षीच अभ्यासक्रम बदलत नसल्यामुळे जुन्या पुस्तकांचा पुनर्वापर करता येऊ शकतो. यासाठी शिक्षण विभागाने विनंती केल्यानुसार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळांकडे मागील वर्षाची पुस्तके परत करीत समजूतदारपणा दाखविला आहे.
मागील वर्षी जळगाव जिल्ह्यामध्ये ४ लाख २२ हजार विद्यार्थ्यांना समग्र शिक्षण अभियानांतर्गत पुस्तकांचे मोफत वितरण करण्यात आले होेते. दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे प्राथमिक विभागाची वर्षभर शाळा भरलीच नाही. तर ५ ते ८ वीपर्यंतची २७ जानेवारीपासून शाळा सुरू करण्यात आली. मात्र, त्यांचेही वर्ग काही दिवसच भरले. त्यामुळे मागील वर्षी विद्यार्थ्यांना वितरित केलेल्या पुस्तकांचा पाहिजे तसा वापरच झाला नसल्याने पुस्तके जशीच्या तशीच होती. त्यामुळे शिक्षण विभागाने पालकांना मागील वर्षीची पुस्तके परत करण्याची विनंती केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील बहुतांश पालकांनी पुस्तके परत करून आपले कर्तव्य बजावले आहे. काही दिवसांपूर्वी शिक्षण विभागाकडून गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठविण्यात आले होते. त्यानुसार शाळांनी पालकांना सूचना करून पुस्तके परत मागविली होती. काही शाळांमध्ये आठवडाभरापूर्वी पुस्तके जमा झाली आहेत. तर काही ठिकाणी पुस्तक जमा करण्यास सुरुवात झाली आहे.
पुनर्वापर केल्यास कागदाची होणार बचत
पुस्तकांचा पुनर्वापर केल्यास मोठ्या प्रमाणात कागदांची बचत होणार असून या माध्यमातून होणारा खर्चही वाचणार आहे. विशेष म्हणजे, पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लागू शकतो.
- मागील वर्षीची मागणी
४ लाख २२ हजार (पुस्तक संच)
=============
जनजागृतीची गरज
पुस्तकाच्या पुनर्वापरासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. दरवर्षी फुकट पुस्तक मिळत असल्यामुळे काही पालक डोक्याला ताप लावून घेण्याच्या भानगडीत पडत नाहीत. त्यामुळे शिक्षण विभागाने पुस्तकाच्या पुनर्वापरासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्यास याचा बऱ्यापैकी फायदा होण्यास मदत होईल.
===========
अद्याप संख्या प्राप्त नाही
पालकांकडून पाल्याची पुस्तके शाळांना परत केली जात आहेत. मात्र, आतापर्यंत किती पालकांनी पुस्तके परत केली याची आकडेवारी शिक्षण विभागाकडे अजून प्राप्त झालेली नाही. लवकरच ही संख्या कळणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
===========
शासनाने केलेल्या सूचनेप्रमाणे पुस्तके परत मागवली जात आहेत. त्यासंबंधीचे पत्रही पाठवण्यात आले.
त्यानुसार जिल्ह्यातील काही पालकांनी मागील वर्षीचे पुस्तक शाळांमध्ये जमा केले आहे. पर्यावरण संवर्धन आणि खर्च वाचविण्यासाठी पुस्तकांचा पुनर्वापर करण्यासंदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे.
- बी.एस.अकलाडे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग
=============
मागील आठवड्यात पाल्याची पुस्तके शाळेमध्ये जमा केली आहेत. शासनाचा चांगला उपक्रम आहे. यामुळे कागदाची बचत होणार आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे पुस्तकांचा अधिक वापर झालेला नाही. अर्थात नवीन मुलांना चांगली पुस्तके मिळणार आहेत.
- सोनू सोनार, पालक
============
अशी आहे विद्यार्थी संख्या
पहिली- ७६५१४
दुसरी- ७३३१३
तिसरी- ७७९१८
चौथी- ८००५०
पाचवी- ७८८२८
सहावी- ७७३११
सातवी- ७७२९७
आठवी- ७६३८५