मुक्ताईनगर : वारकरी संप्रदायातील चारधामापैकी श्रीक्षेत्र कोथळी- मुक्ताईनगर या धामावर संत मुक्ताबाई अंतर्धान समाधी सप्तशतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सद्गुरू दिगंबर महाराज चिनावलकर पायी दिंडी परंपरा व मठ संस्था यांच्या वतीने ज्ञानेश्वरी पारायण व नामसंकीर्तन सोहळा संत मुक्ताबाई समाधीस्थळ कोथळी जुने मंदिरात साजरा होत आहे.
आदिशक्ती मुक्ताबाईंनी इ.स १२९७ साली विजेच्या प्रचंड कडकडाटात कोथळी (मुक्ताईनगर) येथे अंतर्धान समाधी घेतली. त्याला यंदा ७२५ वर्ष पूर्ण होत आहेत. या सप्तशतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त संत मुक्ताबाई समाधी स्थानावर वर्षभर सप्ताह रूपाने सेवा देण्याचे आवाहन केले होते. त्यालाच प्रतिसाद म्हणून सद्गुरू दिगंबर महाराज चिनावलकर पायी दिंडी परंपरा व मठ संस्था यांच्याद्वारा कोथळी येथे २० पासून नामसंकीर्तन सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन, प्रवचन आदी विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहे. २७ रोजी काल्याच्या कीर्तनाने समारोप होईल.
दिगंबर महाराज चिनावलकर दिंडी मठ उपाध्यक्ष घनश्याम पाटील यांनी सपत्नीक मुक्ताई अभिषेक, कलशपूजन, ग्रंथपूजन केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे, गादीपती ह.भ.प. दुर्गादास महाराज नेहते, विश्वस्त विजय महाजन, टेणू फेगडे, संत मुक्ताबाई संस्थान कोथळी-मुक्ताईनगर अध्यक्ष रवींद्र पाटील, व्यवस्थापक उध्दव जुनारे, पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे, भावराव महाराज पाटील, मुकेश महाराज पाटील, कळमोदा उपस्थित होते.
ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ नेतृत्व दुर्गादास महाराज व पराग महाराज चोपडे (भालोद) हे करीत आहे. अमोल महाराज भंजाले (रावेर), गोपाळ महाराज (विवरा), लक्ष्मण महाराज (वाघोदे) , किरण महाराज (धामणदे) यांची प्रवचने तर पराग महाराज चोपडे, भरत महाराज म्हैसवाडीकर, भावराव महाराज पाटील, भरत महाराज बेळीकर,धनराज महाराज अंजाळेकर, रवींद्र महाराज हरणे, दुर्गादास महाराज नेहते यांची कीर्तने होत आहे कार्यक्रमास फैजपूर, न्हावी, रोझोदा, कळमोदा, रावेर, चिनावल, बोरखेडा, बामणोद, पाडळसे, भुसावळ येथील भाविक सहभागी झाले आहेत. खासदार रक्षा खडसे, झेंडूजी महाराज मठाचे दत्तू पाटील, विष्णू पाटील, मारुती परदेशी आदींनी कार्यक्रमास यांनी भेटी दिली. २७ रोजी सकाळी काल्याचे कीर्तनाने सप्ताहाची सांगता होईल.
मुक्ताबाई अभिषेक पूजा करतांना दिगंबर महाराज चिनावलकर मठाचे उपाध्यक्ष घनश्याम पाटील सपत्नीक. (छाया : मतीन शेख)