लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शिरसोली प्र.न., म्हसावद आणि धानवड या गावांमध्ये अनुसूचित जमाती महिला राखीव सरपंच देण्यात आले आहे. मात्र या गावांमध्ये या प्रवर्गाचे महिला सदस्यच नसल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे. शिरसोली प्र.न. म्हसावद आणि धानवड येथे प्रत्येकी एक अनुसूचित जमातीचे सदस्य आहेत आणि तेदेखील पुरुष आहेत. त्यामुळे या आरक्षण प्रक्रियेवर या गावातील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर पंचायत समितीचे सभापती नंदलाल पाटील हे देखील यावेळी प्रांत अधिकारी प्रसाद मते आणि तहसीलदारांवर चिडले होते.
आरक्षणाची प्रक्रिया ही गावातील संबंधित प्रवर्गाच्या लोकसंख्येवर असते. आरक्षणानंतर त्यातून महिला की पुरूष हे चिठ्ठीद्वारे काढले जाते. त्यात या तिन्ही गावांना एस.टी महिला (अनुसूचित जमाती)चे आरक्षण मिळाले आहे. मात्र त्या गावांमध्ये आरक्षणानुसार सदस्यच नाहीत. हे लक्षात आल्यानंतर शिरसोलीचे माजी सरपंच अनिल पाटील, आणि पं.स. सभापती नंदलाल पाटील यांनी जोरदार आक्षेप घेतला. त्यावर तहसीलदार नामदेव पाटील यांनी यावर फेरआरक्षण होऊ शकते. मात्र ते महिला गटातच मिळेल, असे सांगितले. या गावात एस.सी. महिला प्रवर्गातदेखील महिला उमेदवार नाही. त्यामुळे आरक्षण देणार कसे, असा प्रश्न उभा राहिला आहे.
वॉर्ड रचनेनुसार आरक्षण द्या - अनिल पाटील
शिरसोली प्र.न. सह तालुक्यातील इतर गावांमध्येदेखील वॉर्ड रचनेनुसार आरक्षण देण्यात यावे, ही आमची मागणी आहे. गावांमध्ये जे आरक्षण आहे त्यानुसार उमेदवारच नसल्याचे समोर येत आहे. त्यातून अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात, असे शिरसोलीचे माजी सरपंच अनिल पाटील यांनी सांगितले.
न्यायालयात जाणार - नंदलाल पाटील
शिरसोली प्र.न. या गावात आरक्षणानुसार पात्र उमेदवार नाही. त्याचे आरक्षण बदलूनदेखील दिले जात नाही. त्यामुळे यासाठी आम्ही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे तक्रार दाखल करणार आहोत. त्यानंतर गरज भासल्यास या प्रकरणी न्यायालयातदेखील याचिका दाखल करू, असे पंचायत समितीचे सभापती नंदलाल पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.