नशिराबाद : ‘‘पहिली गं पूजा बाई... देवा-देवा साजे’’, भाद्रपदेचा महिना आला, आम्हा मुलींना आनंद झाला.... या गाण्यांचे स्वर घरोघरी गुंजण्यास सोमवारपासून सुरुवात झाली आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या भुलाबाई या उत्सवास भाद्रपद पौर्णिमेपासून मोठ्या दिमाखात प्रारंभ झाला.
भुलाबाई म्हणजे देवी पार्वती. एका आख्यायिकेनुसार पार्वतीकडून सारीपाटात सर्वकाही हरल्यावर शंकर कैलास सोडून रुसून निघून जातात. शंकराला परत आणायला पार्वती भिल्लीणीचे रूप घेते. ती नृत्य करून शंकराला प्रसन्न करून घेते. शंकर पार्वतीच्या रूपाला भुलले म्हणून त्यांना भुलोबा किंवा भुलोजी राणा म्हणतात. तर, पार्वतीला भुलाबाई म्हणतात. शंकर, पार्वतीला कोजागरीला तिच्या माहेरी घ्यायला जायचे आणि या दिवसात पार्वती तिच्या मैत्रिणींसोबत शंकराच्या आठवणीत गाणी म्हणायची. पूर्वीच्या काळापासून चालत आलेली ही परंपरा आज २१ व्या शतकातही कायम आहे.
भाद्रपद पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा म्हणजेच कोजागरी पौर्णिमेच्या एक महिन्याच्या कालावधीत भुलाबाईचा उत्सव साजरा केला जातो. खेळत्या वयाच्या मुली, सासुरवाशिणी भुलाबाईची घरी प्रतिष्ठापना केली जाते.
सर्जनतेचा उत्सव
भुलाबाई म्हणजे नेमकं काय? तर भुलाबाई म्हणजे पार्वती... जगन्माता... भूमीसारखी सर्जनशील... हा खेळोत्सव म्हणजे भूमीचा पार्वतीचा सर्जनोत्सव अन् शिवशक्तीची पूजा... एकप्रकारचा भक्ती विधी... भुलोबा हे शंकराचे प्रतीक... या पूजेत खेळोत्सवात शंकराची फक्त हजेरी असते.