मतीन शेख
लोकमत न्यूज नेटवर्क
मुक्ताईनगर : तालुक्यात १५ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. सात महिने उलटून गेले तरी अद्यापही तालुक्यातील २७ हजार ७७३ नागरिकांनीच पहिला डोस घेतला आहे, तर ८ हजार ९५८ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. लसीकरणाचे डोस कमी येत आहे. त्यातच तिसऱ्या लाटेची भीती पाहता लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी नेहमीच नागरिकांची झुंबड दिसून येत आहे. पहिला डोस घेतलेल्या २७ हजार ७७३ नागरिकांना अद्यापही दुसऱ्या डोसची प्रतीक्षा आहे.
कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्यानंतर आता तिसऱ्या लाटेच्या भाकितामुळे नागरिक चिंतेत आहेत. तालुक्यात ठिकठिकाणी लसीकरण केंद्रावर गर्दी होऊ लागली आहे. अगदी मध्यरात्रीपासून नागरिक आरोग्य केंद्रवजा लसीकरण केंद्राबाहेर नंबर लावत आहेत.
मुक्ताईनगर शहरात नगरपंचायत परिसरात लसीकरण केंद्राबाहेर अगदी पाण्याच्या डबक्यात उभे राहून नागरिकांनी लसीकरणासाठी नंबर लावल्याचे दिसून आले, तर उचंदे रुईखेडा येथे मध्यरात्री व पहाटेपासून नागरिक लसीकरणासाठी येत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
तालुक्यात १ लाख ५८ हजार लोकसंख्येपैकी वय वर्षे १८ च्या वरील नागरिकांना कोराना लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. प्रत्यक्षात १५ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य महसूल, पंचायत समिती, पोलीस विभाग आणि विविध प्रशासकीय विभागातील कर्मचाऱ्यांना लसीकरण पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात आले होते. त्यानंतर ६० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिक, तसेच ४५ ते ५९ वयोगटातील दुर्धर आजारग्रस्त नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले, तर आता १८ वर्षे व त्यावरील सर्व वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे.
मे महिन्यात मध्यंतरापर्यंत लसीकरणाच्या मोहिमेला मिळणारा प्रतिसाद किंचित थंड पडला होता; परंतु अलीकडे तिसऱ्या लाटेचे भाकीत वर्तविले जात असताना लसीकरणासाठी नागरिकांची धावपळ वाढली आहे. लसीकरणासाठी वाढती गर्दी, त्यात लसीकरण केंद्रावर येणारे लसीचे मर्यादित डोस आणि अपूर्ण पुरवठा यामुळे लसीकरण केंद्रावर सातत्याने गर्दी होत आहे.
तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र, आयुष दवाखाने आणि अंगणवाडी, अशा २३ ठिकाणी लसींच्या उपलब्ध साठ्यानुसार लसीकरण करण्यात येत आहे.
आतापर्यंत फ्रंटलाइन वर्कर- ३४५०, हेडक्वार्टर वर्कर- १५६३, ज्येष्ठ नागरिक- १०६८८, ४५ ते ५९ वयोगटातील नागरिक- ११६३९, १८ ते ४४ वयोगटातील नागरिक- ९३९१ याप्रमाणे लसीकरण करण्यात आले आहे.
लसीकरणाबाबत तालुक्याची स्थिती
तालुक्यातील एकूण लोकसंख्या - १ लाख ५९ हजार
पहिला डोस घेतलेले नागरिक- २७ हजार ७७३
दुसरा डोस घेतलेले नागरिक- ८ हजार ९५८
जिल्हा स्तरावरून तालुक्यासाठी उपलब्ध होणाऱ्या लसींच्या साठ्याचे नियोजन करून विविध लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून १०० टक्के वापर त्याच दिवशी केला जातो.
-डॉ. नीलेश पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी, मुक्ताईनगर
—————
फोटो ओळ-
शेमळदे, ता. मुक्ताईनगर येथे लसीकरणासाठी लागलेली रांग.