पिंप्राळ्यातील बाजार भरतोय निवृत्तीनगरात
जळगाव - शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाने शहरातील आठवडी बाजार बंद केले आहेत. मात्र तरीही हे बाजार आता गल्लीबोळात भरू लागले आहेत. पिंप्राळ्यातील आठवडे बाजार आता निवृत्तीनगरात भरत असून, या ठिकाणी विक्रेत्यांसह नागरिकांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. महापालिका प्रशासनाकडून या ठिकाणी कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
गिरणा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा सुरूच
जळगाव - जिल्ह्यात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने संपूर्ण जिल्हा प्रशासन यावर नियंत्रण करण्यासाठी उपाय योजना मध्ये गुंतले आहे.
कोरोना चा वाढता प्रादुर्भाव वाळू माफिया साठी फायद्याचे ठरताना दिसून येत आहे. गिरणा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. विशेष म्हणजे भरदिवसा हा उपसा सुरु असतानाही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तसेच ग्रामपंचायतींमधील ग्राम दक्षता समिती देखील कुचकामी ठरताना दिसून येत आहे.
सातपुड्यातील काही भागात पुन्हा वनवा पेटला
जळगाव - गेल्या आठवड्यात सातपुडा भागामधील चोपडा व यावल तालुक्यातील अनेक भागात वनवा पेटल्यामुळे शेकडो हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. वन विभागातील कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर हा वणवा आटोक्यात आणण्यात आला होता. मात्र, गौऱ्या पाडा भागात पुन्हा वणवा पेटला असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे वन विभागातील कर्मचाऱ्यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.