भुसावळ : शहरात नगरपालिका प्रशासनातर्फे होत असलेला पाणीपुरवठा दूषित होत आहे. याबाबत विरोधी गटातील नगरसेवकांनी आक्रमक होत पाणीपुरवठा अभियंत्यांना २७ रोजी जाब विचारत घेराव घातला.
शहरात सध्या अनियमित व अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. गेल्या ८-१० दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. सध्या सुरु असलेला पाऊस व त्यातच हतनूर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्यामुळे पाणीपुरवठा करताना अडचणी येत असल्याची भूमिका पालिका प्रशासनाने मांडली होती; मात्र पावसाची समस्या ही गेल्या ८-१० दिवसांपासून निर्माण झाली आहे; मात्र या आधीपासून पाणीपुरवठ्याची समस्या कायम आहे. ही बाब लक्षात घेत २७ रोजी पालिकेतील विरोधी राष्ट्रवादी गटाच्या नगरसेवकांनी नगरपालिकेचे फिल्टर हाऊस गाठत पाहणी केली. दरम्यान, त्यांनी तापीतील बंधाऱ्यापासून ते फिल्टर हाऊसपर्यंतच्या प्रत्येक यंत्रणेची पाहणी केली. यावेळी कृउबा सभापती सचिन चौधरी, विरोधी गटनेते दुर्गेश ठाकूर, उल्हास पगारे, शे. शाकीर,सलीम पिंजारी, प्रदीप देशमुख, सचिन पाटील, साजिद शे. आदी उपस्थित होते.
विरोधी गटातील सदस्यांनी फिल्टर हाऊसची पाहणी केल्यानंतर पाण्याचे नमुने घेत पाणीपुरवठा अभियंता सतीश देशमुख व पदाधिकारी यांनी घेराव घातला. गटनेता दुर्गेश ठाकूर व सचिन चौधरी यांनी प्रलंबित असलेल्या अमृत योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम अपूर्ण आहे. अमृतच्या फिल्टर प्लँटचे नियोजन नाही. तापी नदीतील अमृतच्या बंधाऱ्याबाबतचा अहवाल नाही आदी मुद्दे मांडत शहरात अंथरलेल्या पाईपलाईनमधून फक्त हवाच पुरवणार का? असा सवाल करीत जीर्ण झालेल्या फिल्टर प्लँटऐवजी नवीन फिल्टर प्लँटच्या प्रस्तावाकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. प्रशासनाने स्वत: कुठल्याही भागातील पाण्याचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविल्यास ते दूषितच आढळतील असे सांगितले.
यावर पाणीपुरवठा अभियंता सतीश देशमुख यांनी प्रशासनाची बाजू मांडत गेल्या आठवडाभरात झालेल्या पावसामुळे पाणीपुरवठ्यात अडचण निर्माण झाली. नदीपात्रातून गढूळ पाणी उचलले जात आहे. यावर उपाय म्हणून पाणी शुद्धीकरणासाठी शक्य ते प्रयत्न होत आहेत. यासह आवश्यक त्या उपाययोजना प्रशासनातर्फे राबविण्यात येत असल्याचे सांगितले.
२८ एचएसके १२
गढूळ पाणी अभियंत्यांना दाखविताना विरोधी गटाचे नगरसेवक. (फोटो : हबीब चव्हाण)