जळगाव : जिल्ह्यात काेविशिल्ड लस उपलब्ध नसल्याने अनेक केंद्रांवरचे लसीकरण ठप्प झाले आहेत. यात जळगाव शहरातील सर्वच केंद्रांवर लसीकरण पूर्णत: ठप्प झाले आहे. जिल्ह्यात कोविशिल्ड लसीचे केवळ ९ हजार डोस असून ज्या केंद्रांवर ते आहेत त्याच केंद्रावर एक ते दोन दिवस हे लसीकरण सुरू राहू शकेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील सर्व रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू आहे. यासह जिल्ह्यात ३७ विविध केंद्र आहेत. यापैकी गेल्या दोन दिवसांपासून २३ केंद्रावर लसीकरण झाले मात्र, तेही अगदी कमी प्रमाणात सुरू आहे. जिल्ह्यात १ लाख ६८ हजार ४४४ जणांनी लसीचा पहिला डोस घेतला असून १९ हजार ३४२ जणांनी दुसरा डोस घेतला आहे.