जळगाव : कृषी विज्ञान केंद्र ममुराबादतर्फे आयोजित दुग्ध व्यावसायिक शेतकऱ्यांसाठी एकदिवसीय दुग्ध प्रक्रिया तंत्रज्ञानावर ऑनलाईन शेतकरी प्रशिक्षण झाले. यावेळी कृषी महाविद्यालय पुणे येथील सहयोगी प्रा. डॉ. धीरज कंखरे, तुषार गोर यांनी मार्गदर्शन केले. वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. हेमंत बाहेती यांनी प्रास्ताविक केले. कंखरे यांनी दूध उत्पादन केल्यावर त्यापासून पदार्थ बनवून विक्रीस कसा वाव आहे याबाबत मार्गदर्शन केले. तुषार गोरे यांनी दुग्ध उत्पादनासाठी लागणारी यंत्रे, त्यांचे कार्य व व्यवस्थापन यावर सखोल मार्गदर्शन केले. आभार किरण मांडवडे यांनी मानले.
उमेश शिंदे यांचा सत्कार
जळगाव : मुद्रांक जिल्हाधिकारी पदी उमेश शिंदे यांची नियुक्ती झाली. त्याबद्दल त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष वासुदेव चव्हाण, निवृत्ती पाटील, राजेश कुलकर्णी, मनपा विधी सभापती ॲड. दिलीप पोकळे, कोषाध्यक्ष रघुनाथ पाटील, राजेंद्र बारी, सुधाकर जोशी, दिनेश परदेशी, विनोद परदेशी, सुखदेव जाधव, राजेंद्र आंबटकर, विजय कोळी, युवराज चौधरी, सुनील चौधरी, आर. डी. बडगुजर, सुनील बारी, नंदकुमार कुलकर्णी, अनिल मराठे उपस्थित होते.
जिल्हा कौशल्य विकास विभागातर्फे आज मार्गदर्शन
जळगाव : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयातर्फे स्वयंरोजगार सुरू असताना काय काळजी घ्यावी, यावर ऑनलाईन मार्गदर्शन सत्र आज, शुक्रवारी दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आले आहे. यावेळी लेखक विनोद अनंत मेस्त्री, विकास गोफणे हे मार्गदर्शन करतील.
पीक विमाधारक शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन
जळगाव : पंतप्रधान पीक विमा योजनेच्या खरीप हंगामासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी योजना राबवली जाणार आहे. या योजनेंतर्गत काढणीनंतर झालेल्या नुकसानीची भरपाई दिली जाणार आहे. पीक विमाधारक शेतकऱ्यांच्या अधिसूचित पिकांचे नुकसान झाले असल्यास ७२ तासांच्या आत झालेल्या नुकसानीची सूचना प्रथम विमा कंपनीस द्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे.
जळगावात आज वाणिज्य उत्सवाचे आयोजन
जळगाव : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत वाणिज्य विभागातर्फे आज, शुक्रवारी दुपारी एक वाजता निर्यातदार उद्योजकांच्या निर्यातवाढीसाठी ‘वाणिज्य उत्सव’ आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उमेशचंद्र दंडगव्हाळ यांनी दिली आहे. निर्यातदारांच्या या संमेलनाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होईल. यावेळी खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेश पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत उपस्थित राहणार आहेत. यावेळी निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक, निर्यातदार, औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.