टेंपो व दुचाकीच्या धडकेत एक जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 09:53 PM2019-11-06T21:53:31+5:302019-11-06T21:53:35+5:30

एक गंभीर : आशिया महामार्गावर म्हसवे गावानजीकची घटना

One killed in a collision with a tempo and two wheels | टेंपो व दुचाकीच्या धडकेत एक जागीच ठार

टेंपो व दुचाकीच्या धडकेत एक जागीच ठार

googlenewsNext




पारोळा : आशिया महामार्गावर पारोळा-जळगाव रोडवर म्हसवे गावानजीक टेंपोने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला तर एक गंभीर जखमी आहे. ही घटना बुधवारी सकाळी १० वाजता घडली.
६ रोजी सकाळी १० वाजता सलमानखान अफजलखान वय (२५) रा. विटाभट्टी, देवपूर, जि.धुळे व त्यासोबत असलेला मूसब्बीर शेख मुक्तार (२३) देवपूर, धुळे हे दोघे धुळ्याहून जळगाव येथे मामेसासऱ्याच्या मुलाच्या लग्नाला मोटारसायकल एमएच-४१-पी-८६२० ने जात असताना पारोळा तालुक्यातील म्हसवे फाट्यानजीक टेंपोने जबर धडक दिली. त्यात सलमानखान याचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा मुसब्बीर हा गंभीर जखमी झाल्याने त्यास घटनास्थळावरून ईश्वर ठाकूर यांनी कुटीर रुग्णालयात दाखल केले. त्यावर डॉ.राजेश वालडे यांनी प्रथमोपचार करून धुळे येथे हलविले. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात शारुखखान पठाण रा.देवपूर, जि.धुळे यांच्या फिर्यादीवरून अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

महामार्गावरील खड्डे आणखी किती बळी घेणार?
पारोळा ते जळगाव या आशिया महामार्ग ४६ वर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांतून वाहने चालविताना वाहन चालकाला खूप कसरत करावी लागते. खड्डे वाचविताना देखील अपघात होत आहेत. सदर अपघातही खड्डे वाचवताना झाला आणि त्यात नाहक दुचाकीचालकाचा जीव गेला.
या मार्गावरील खड्ड्यांकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. त्यामुळे या महामार्गावरील खड्डे आणखी किती बळी घेतील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रशासनासह लोकप्रतिनिधींना आणखी बळी गेल्यानंतर जाग येईल का? असाही प्रश्न संतप्त ग्रामस्थांनी यावेळी उपस्थित केला. आठ दिवसांच्या आत महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम न झाल्यास महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक संघटनांनी यावेळी दिला.

अपघातानंतर दोन ते तीन किमी वाहनांच्या रांगा
म्हसवे गावानजीक सकाळी अपघात झाला त्यावेळी महामार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. विजय पाटील यांच्यासह काही संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. महामार्गाचे अधिकारी खड्डे बुजवण्याबाबत ठोस आश्वासन देत नाही तोपर्यंत रास्ता रोको करणार, अशी भूमिका या परिसरातील ग्रामस्थांनी घेतली होती. यावेळी पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे यांच्यासह पोलिसांनी ग्रामस्थांची समजूत काढत त्यांना थांबविले. मयताच्या नातेवाईकांनी अधिकारी वर्गावर रोष व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली.

खासदारांनी महामार्गाबाबत पाठपुरावा करावा
खासदार उन्मेष पाटील यांनी या रखडलेल्या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाबाबत पाठपुरावा करावा. किमान नव्या महामार्गाचे काम सुरू होत नसेल तर जुन्या महामार्गावरील खड्डे तरी बुजवावेत, अशी मागणी होत आहे.
गेंड्याच्या कातडीचे शासन आणि प्रशासन--बाळासाहेब पाटील
गेल्या ३ ते ४ महिन्यांपासून महामार्गावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. त्याच रस्त्याने लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे अधिकारीदेखील प्रवास करतात. मात्र तेही याकडे दुर्लक्ष करताना दिसताहेत.
बाळासाहेब पाटील, अध्यक्ष, महाराणा बहुउद्देशीय संस्था

Web Title: One killed in a collision with a tempo and two wheels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.