जळगाव : शहरातील दुचाकी चोरीचे सत्र थांबत नसून चक्क सहायक धर्मादाय आयुक्त यांची दुचाकी गणेश कॉलनी परिसरातून अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर पार्क परिसरातील रहिवासी रंजना माधवराव ठवरे या गणेश कॉलनी येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयात सहाय्यक धर्मदाय आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी सकाळी १० वाजता त्या दुचाकीने (एमएच ४०-एन ७०७३) कार्यालयात आल्या. कामकाज आटोपून घरी जाण्यासाठी दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्या कार्यालयाखाली आल्यानंतर त्यांना त्यांची दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली़ त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फिरोज तडवी करीत आहेत.