लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : भाजपच्या अधिकृत संकेतस्थळावर रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजप खासदार रक्षा खडसेंच्या बाबतीत आक्षेपार्ह उल्लेख केल्याची बाब समोर आली आहे. याबाबतचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या आक्षेपार्ह उल्लेखाबाबत चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. याबाबत खासदार रक्षा खडसे यांनी सांगितले की, भाजपच्या संकेतस्थळाच्या बाबतीत घडलेल्या प्रकाराची माहिती मला काल सायंकाळी झाली. त्यानंतर स्वतः पोलीस अधीक्षक आणि पक्षाच्या वरिष्ठांशी याबाबत चर्चा केली असून, या प्रकाराची चौकशी सुरू आहे. हा प्रकार भाजपकडून घडलेला नाही. चौकशीत तथ्य समोर येईल, अशी प्रतिक्रिया खडसे यांनी दिली आहे.
रक्षा खडसे या रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या होत्या. या वेळी त्यांनी भाजपच्या संकेतस्थळावर झालेल्या चुकीच्या प्रकाराबाबत आपले मत मांडले. भाजपच्या संकेतस्थळावर लोकसभा सदस्यांच्या यादीत माझ्या नावाखाली आक्षेपार्ह शब्दप्रयोग असल्याबाबत बुधवारी सायंकाळी माहिती मिळाली. माझ्याकडे व्हॉट्सॲपवर याबाबत जे काही स्क्रीनशॉट आलेत, त्यात हा प्रकार ‘सेव्ह महाराष्ट्र फ्रॉम बीजेपी’ म्हणून असलेल्या पेजवरून व्हायरल झाल्याचे दिसते आहे. हे पेज कोण चालवतो, त्याची मला माहिती नाही. पण, या प्रकाराची पोलीस आणि आमच्या पक्षाकडून चौकशी सुरू आहे, असे खासदार रक्षा खडसे यांनी सांगितले.
एडिटिंग करून स्क्रीनशॉट घेतले असावेत
हा प्रकार मला कळाल्यानंतर मी रात्री १० वाजेच्या सुमारास भाजपच्या अधिकृत संकेतस्थळावर तपासणी केली, तेव्हा मला कोणत्याही प्रकारची गडबड आढळली नाही. त्यामुळे कुणीतरी भाजपच्या संकेतस्थळाचे स्क्रीनशॉट घेऊन नंतर त्यावर एडिटिंग करून हा प्रकार केल्याचा संशय आहे. आता या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, त्यात सारा प्रकार समोर येईलच, असा विश्वास त्यांनी वर्तवला. एखाद्या महिलेच्या बाबतीत असा प्रकार घडल्यानंतर अशा गोष्टीला सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील, त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल करणे चुकीचे आहे. या साऱ्या प्रकारामुळे मला दुःख झाल्याचेही खडसे म्हणाल्या
चावटपणा करणाऱ्याला आतमध्ये टाका - गुलाबराव पाटील
कोणत्याही महिलेच्या विरुद्ध कुणी असे आक्षेपार्ह टाकत असेल तर त्याची चौकशीच नव्हेतर, त्याला शिक्षा दिली गेली पाहिजे. कारण महिलेचा सन्मान ठेवणारे आमचे राज्य आणि देशही आहे. त्यामुळे असा चावटपणा करणाऱ्याला आतमध्ये टाकायला हवे, अशी संतप्त प्रतिक्रिया पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे.