अस्मानी संकटे असो की, दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टीत पिकांचे नुकसान होते. नुकसानीनंतर पंचनाम्यासाठी महसूल व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांची शेतकऱ्यांनी वाट पाहावी लागते. पंचनाम्यांसाठी सरकारचा आदेश निघतो. यासाठी थेट मंत्री महोदयांचे पाहणी दौरेही होतात. या सर्व प्रक्रियेत नुकसानीच्या पंचनाम्यांना उशीर होऊन मदतीसाठी मोठी प्रतीक्षा करावी लागते.
शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आणि पंचनाम्यांचा अहवाल यात तफावत असते. यामुळे मदत मिळताना शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याच्या घटनादेखील समोर आल्या आहेत. ई-पीकपाहणी अॕॅपमुळे या सर्व वेळखाऊ प्रक्रियेला फाटा मिळणार आहे. शेतकरी थेट नुकसानग्रस्त पिकांची छायाचित्रे व माहिती ई-पीक अॕॅपवर पाठवू शकणार आहे.
चौकट
प्रशिक्षणात तलाठी व मंडळ अधिकारी सहभागी
ई-पीकपाहणी अॕॅपविषयी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी गुरुवारी तालुकास्तरावरील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांचे एक दिवसाचे प्रशिक्षण सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत पार पडले. प्रशिक्षणात ८५ तलाठी, २० मंडळ अधिकारी सहभागी झाले होते. जनार्दन बंगाळे व सचिन जगताप यांनी अॕॅपविषयी माहिती दिली. यावेळी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे व महसूल विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
ई-पीकपाहणी अॕॅपची तालुक्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महसूल विभाग सज्ज झाला आहे. गुरुवारी प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी ग्रामीण भागातून शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन करून माहिती देणार आहे. शुक्रवारी अॕॅपचे लोकार्पण होत आहे.
-अमोल मोरे,
तहसीलदार, चाळीसगाव