शासकीय कार्यालयांमध्ये कोरोनाबाबत बेफिकिरीच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:25 AM2021-02-23T04:25:18+5:302021-02-23T04:25:18+5:30

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे नाव, नंबर व पत्ता घेण्यात येत असून, तापमान तपासूनच ...

No worries about corona in government offices. | शासकीय कार्यालयांमध्ये कोरोनाबाबत बेफिकिरीच..

शासकीय कार्यालयांमध्ये कोरोनाबाबत बेफिकिरीच..

Next

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे नाव, नंबर व पत्ता घेण्यात येत असून, तापमान तपासूनच प्रवेश देण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे मनपा, जिल्हा परिषद व पोलीस अधीक्षक कार्यालयात या नियमांचे कुठलेही पालन होत नसून, कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतांनाही `आओ जाओ घर तुम्हारा `असल्यासारखे वातावरण `लोकमत ` प्रतिनिधीने सोमवारी केलेल्या पाहणीतून दिसून आले.

गेल्या आठवड्यापासून शहरासह जिल्हाभरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे, जिल्हा प्रशासनाने कठोर उपाययोजना राबवायला सुरुवात केली आहे. मंगळवारपासून तर ६ मार्चपर्यंत शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हे करीत असताना नागरिकांना मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन व सॅनिटायझरचा वापर करण्याचे वेळोवेळी आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात विविध उपाययोजना करण्यात येत असताना, गर्दीची नेहमी ठिकाणे असणाऱ्या इतर शासकीय कार्यालयांमध्ये कुठल्याही उपाययोजना करण्यात आलेल्या दिसून आल्या नाहीत.

इन्फो :

महापालिका इमारत

लोकमत प्रतिनिधीने या ठिकाणी पाहणी केली असता, प्रवेशद्वाराजवळच असलेल्या लिफ्टच्या ठिकाणी १० ते १२ नागरिक फिजिकल डिस्टन्सिंगचे कुठलेही पालन न करता उभे होते. विशेष म्हणजे दोन नागरिकांना मास्क काढलेला दिसून आला. तसेच येणाऱ्या नागरिकांची कुठलीही नोंद होत नसून, सॅनिटायझरची व्यवस्थादेखील दिसून आली नाही. जे दोन नागरिक विनामास्क होते, त्यांनांही येथील मनपा कर्मचाऱ्यांनी मास घालण्याबाबत हटकलेसुद्धा नाही. त्यामुळे मनपाचे उपाययोजनांकडे स्पशेल दुर्लक्ष झालेले दिसून

इन्फो

जिल्हा परिषद

जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीमध्ये सीईओ व अध्यक्षांना भेटण्यासाठी नेहमीप्रमाणे ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची गर्दी दिसून आली. यातील बहुतांश नागरिकांनी गप्पा मारताना मास्क काढले होते. विशेष म्हणजे फिजिकल डिस्टन्सिंगचेही या कार्यकर्त्यांनी पालन केलेले दिसून आले नाही. या ठिकाणी बाहेरून येणाऱ्या नागरिकांची कुठलीही नोंद होत नसल्याचे दिसून आले.

इन्फो

पोलीस अधीक्षक कार्यालय

या ठिकाणीदेखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनातर्फे कुठलीही खबरदारी घेण्यात आलेली दिसून आली नाही. विशेष म्हणजे कोरोनाकाळात लावण्यात आलेले सॅनिटायझरचे स्टॅण्डही उचलून घेण्यात आले होते. कामानिमित्त बाहेरून येणाऱ्या नागरिकांची कुठलीही चौकशी अथवा नोंद करण्यात येत नव्हती. काही नागरिक मास्क काढून बोलत असतानाही, पोलिसांकडून मास्क वापराबाबत नागरिकांना कुठल्याही सूचना करण्यात येत नव्हत्या.

इन्फो :

जिल्हाधिकारी कार्यालयात मात्र कठोर अंमलबजावणी

जिल्हाधिकारी कार्यालयात मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कठोर उपाययोजना राबवितांना दिसून आले. प्रशासकीय इमारतीत येण्यासाठी सर्व मार्ग बंद करुन फक्त एकच मार्ग सुरू ठेवण्यात आला आहे. या एकच मार्गावरही दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे नाव, नंबर व पत्ता रजिस्टरमध्ये नोंद करण्यात येत आहे. तसेच गन मशीनने तापमानाची नोंद घेऊनच इमारतीत प्रवेश देण्यात येत असून, नागरिकांना मास्क न काढण्याच्या सूचना करण्यात येत आहेत. एकंदरीत जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व उपाययोजना करण्यात आल्या असल्याचे दिसून आले.

Web Title: No worries about corona in government offices.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.