लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महाबळ परिसरातील संभाजी राजे नाट्यगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दिवसभर भाजी विक्रेते बसलेले असतात. मात्र त्यापैकी बहुतेक जण मास्क लावत नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत समोर आले आहे. या ठिकाणी शुक्रवारी दुपारी दोन वाजता १६ भाजी आणि फळविक्रेत्यांचे स्टॉल लागले होते.
या भाजीबाजारात महाबळ, संभाजी नगर, मायादेवी नगर, यासह परिसरातून नागरिक भाजीपाला आणि फळे यांच्या खरेदीसाठी येत असतात. मात्र त्याचवेळी विक्रेते मास्क लावत नसल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी दुपारी दोन वाजता ‘लोकमत’ने या परिसराची पाहणी केली.
सध्या शहरात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे. जिल्ह्यात दररोज रुग्णसंख्या काही एक हजारापेक्षा जास्त येत असली तरी अनेक विक्रेते मास्कशिवाय ग्राहकांशी संवाद साधतात. वस्तूंची देवाणघेवाण करतात. दुकानावर होणाऱ्या गर्दीच्या नियंत्रणासाठी आवश्यक त्या उपाययोजना करत नाहीत. जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालनदेखील हे विक्रेते करत नसल्याने नागरिक वैतागले आहेत.
१) या बाजारात एका फळविक्रेत्याने मास्क लावला नव्हता. मात्र तरीही तेथे बसलेल्या एका व्यक्तीसोबत तो गप्पा मारत होता. ग्राहक जवळ आल्यावरदेखील त्याने मास्क लावला नाही.
२) भाजी विकणाऱ्या महिलेने मास्क लावला नव्हता. मात्र छायाचित्रकाराला पाहताच या महिलने पदर तोंडाला लावून मास्क लावल्यासारखा केला. मात्र काही सेकंदातच तोदेखील दूर केला.
३) भाजीच्या स्टॉलवर तीन जण बसले होते. त्यांनी मास्क लावला नव्हता तरीदेखील ते ग्राहकांना सामान देत होते. ग्राहकांनी हटकल्यावर तात्पुरता मास्क वर करून घेत होते. मात्र लगेचच पुन्हा मास्क नाकाच्या खाली गळ्यावर ओढून घेत होते.
४) भाजीबाजारात प्रवेश करतानाच डाव्या आणि उजव्या बाजूला बसलेल्या फक्त पहिल्याच भाजी आणि फळविक्रेत्यांनी मास्क लावला होता. त्याव्यतिरिक्त एकाही दुकानदाराने मास्क लावलेला नसल्याचे चित्र होते.