चाळीसगाव, जि.जळगाव : ‘चाळीसगाव शहर निर्माल्य संकलन मोहीम २०१८’ अंतर्गत चाळीसगाव शहरात गणेश उत्सवातील निर्माल्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी गणेश विसर्जनाच्या दिवशी युनिटी क्लब व पर्यावरण प्रेमी यांच्या वतीने निर्माल्य संकलन मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत सहभागी गणेशोत्सव मंडळांना युनिटी क्लब व पर्यावरणप्रेमींच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे.‘श्रीं’ना निरोप देतेवेळी पर्यावरण रक्षणाचाही मंत्र जपला जावा, या उद्देशाने शहरातील युनिटी क्लब व पर्यावरणप्रेमींनी पुढाकार घेतला आहे. सर्व गणेश भक्तांना व् मंडळांना आवाहन करण्यात येते की, सर्वत्र १० दिवस मोठ्या उत्साहाने गणपती बाप्पाची स्थापना केली जाते. या उत्सव काळात जमा होणारे निर्माल्य एका ठिकाणी जमा करुन निर्माल्य संकलन मोहिमेत अर्पण करुन जल प्रदूषण टाळावे व या मोहिमेत सहभाग घ्यावा.मोहिमेंतर्गत चाळीसगाव शहरातून निर्माल्य संकलन करून त्याची विगतवारी करण्यात येणार आहे. जमा होणारे निर्माल्याची योग्य विल्हेवाट केली जाणार आहे. संकलित करण्यात येणारे निर्माल्य हे शहरातील गांडूळ खत प्रकल्पाच्या ठिकाणी देण्यात येणार आहे. शहरातील संपूर्ण गल्लोगल्ली निर्माल्य रथ फिरविण्यात येणार असून, संकलन मोहिमेत गणेशोत्सव मंडळांनी सहभाग नोंदवावा. निर्माल्य संकलन, प्लॅस्टिक प्रदूषण रोखण्यासाठीचे प्रयत्न आणि भाविकांचे पर्यावरण विषयक प्रबोधन अशा विविध आयामांवर पर्यावरण प्रेमी काम करीत आहेत.स्वप्निल कोतकर, मनीष मेहता, प्रवीण बागड, हेमंत वाणी, शरद पवार,गणेश सूर्यवंशी, भूपेश शर्मा, निशांत पाठक, स्वप्नील धामणे, गितेश कोटस्थाने, विशाल गोरे, नीलेश जैन, योगेश ब्राह्मणकर, युवराज शिंपी, पीयूष सोनगिरे, किरण पाटील, नीलेश वाणी आदी पर्यावरण प्रेमींच्या वतीने ही मोहीम साकारण्यात येत आहे.
चाळीसगावला निर्माल्य संकलन मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 15:15 IST
पर्यावरप्रेमींचा सहभाग : घरोघरी जाणार निर्माल्य रथ
चाळीसगावला निर्माल्य संकलन मोहीम
ठळक मुद्देमोहिमेत सहभाग नोंदविण्याचे आवाहनजमा होणाऱ्या निर्माल्याची योग्य विल्हेवाट लावणारगल्लोगल्ली निर्माल्य रथ फिरविण्यात येणार