मोहन सारस्वत
दिव्यांगांना एसटी प्रवास सवलतीचे कार्ड बनवून देणाऱ्या टोळीतील दोघांना गेल्या आठवड्यात जामनेर पोलिसांनी अटक केल्यानंतर बनावट कार्डचा विषय पुन्हा समोर आला आहे. एसटीचे अधिकारी व पोलिसांनी केलेली कारवाई अभिनंदनास पात्र आहेच, पण या बनावट कार्ड बनविणाऱ्यांची पाळेमुळे शोधण्याची मोठी जबाबदारी पोलिसांना स्वीकारावी लागेल.
दिव्यांगांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवून देण्यापासून तर त्या प्रमाणपत्रावरून सवलतीचे बनावट कार्ड बनविणाऱ्यांचे गोरखधंदे सध्या वाढले आहे. शासनाची मिळणारी सवलत बनावट कार्ड वापरून पदरात पाडून घेणारे जितके दोषी त्यापेक्षा कार्ड पुरविणारे जास्त दोषी आहे. दोघेही शासनाची फसवणूक करीत असल्याने या प्रकाराकडे पोलिसांनी गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
बनावट कार्ड बनविण्याचा प्रकार केवळ एसटी अथवा दिव्यांगांच्या सवलतीपुरता मर्यादित नाही. स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे केशरी कार्डाचे रूपांतर बीपीएल अथवा अंत्योदय योजनेत करून देण्यासाठी जो गोरखधंदा व आर्थिक देवाणघेवाण केली जाते, त्याकडेदेखील महसूल विभागाने लक्ष दिले पाहिजे. पुरवठा विभागाशी संगनमत करून काही दलालांचा यात असलेला सहभाग नाकारता येणार नाही. दोन ते चार हजारांत हे प्रकार तालुक्यात उघडपणे सुरू असल्याची चर्चा आहे. अमळनेरशी याचा थेट संबंध असल्याचे सांगितले जाते. पोलिसांनी जप्त केलेेल्या दिव्यांगांच्या बनावट कार्डावरदेखील अमळनेरचा पत्ता दिसत असल्याने पोलिसांनी त्यादृष्टीने तपास केल्यास मोठे रॅकेट हाती लागू शकते. काही महिन्यांपूर्वी जामनेरमधील एका किराणा दुकानातून पोलिसांनी बनावट टाटा मिठाच्या गोण्या जप्त केल्या होत्या. त्याचे पुढे काय झाले याची उत्सुकता नागरिकांना लागून आहे.