जळगाव : मनपा महापौर व उपमहापौर यांना दिलेली १० महिन्यांची मुदत संपली असून, विधानसभा निवडणुकीमुळे चार महिने मुदतवाढ देण्यात आली होती. आता विधानसभा निवडणूक संपली असून, राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा संपल्यानंतर मनपात नवीन महापौर व उपमहापौरांची निवड केली जाणार असल्याची माहिती मनपाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर महापौरपदी सीमा भोळे व उपमहापौरपदी डॉ.अश्विन सोनवणे यांची निवड करण्यात आली होती. तसेच दोन्ही पदांना १० महिन्यांचा कार्यकाळ देण्याचे निश्चित करण्यात आले होते. महापौर व उपमहापौरांचा कार्यकाळ जुलै महिन्यातच संपला आहे.मात्र, विधानसभेची निवडणूक लक्षात घेता, पक्ष नेतृत्वाने चार महिन्यांची मुदतवाढ दिली होती. आता ही निवडणूक संपल्यामुळे नवीन महापौर व उपमहापौर निवडीचा हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, नवीन महापौर व उपमहापौरांबाबत अंतीम निर्णय पालकमंत्री गिरीश महाजन हे घेणार आहेत.मात्र, गिरीश महाजन हे सध्या मुंबईत असल्याने ही निवड रखडली आहे. त्यामुळे आता राज्याचा तिढा संपल्यानंतर गिरीश महाजन हे बैठक घेणार असून, त्यानंतरच नवीन महापौर व उपमहापौरांची निवड केली जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.स्वीकृत नगरसेवकपदासाठीही हालचालीमहापौर-उपमहापौरपदासह भाजपच्या चार स्वीकृत नगरसेवकांपैकी दोघांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर इतर दोघांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. घरकुल प्रकरणातील ५ नगरसेवकांच्या भवितव्याबाबत मनपा प्रशासन काय निर्णय घेते ? याकडे देखील लक्ष लागले आहे.कोळी-लेवा किंवा लेवा-मराठा हे समिकरण राहण्याची शक्यतामहापौर-उपमहापौर निवडीबाबत अद्याप कोणतेही नाव जाहीर झाले नाही. महापौरपदासाठी भारती सोनवणे यांचे नाव चर्चेत असून, त्या पाठोपाठ उज्ज्वला बेंडाळे या देखील स्पर्धेत आहेत. भारती सोनवणे यांना संधी देण्यात आली तर उपमहापौरपद हे लेवा समाजातील नगरसेवकाला मिळण्याची शक्यता आहे. तर बेंडाळे यांना संधी मिळाली उपमहापौरपद हे मराठा समाजातील नगरसेवकाला मिळण्याची शक्यता आहे.
राज्याचा तिढा सुटल्यानंतर मनपात नवा महापौर ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 21:12 IST