जळगाव : महापालिकेत महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार शोभा बारी यांनी माघार घेतल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका खुशबू बनसोडे यांची बिनविरोध निवड झाली. पण या निवडीच्या वेळेस समितीमधील सदस्या व त्यांच्याच पक्षातील मंगला चौधरी या अनुपस्थित राहिल्या. चौधरी यांच्यावर पक्षविरोधी काम केल्याबाबत कारवाई केली जाईल, असे मनसेचे गटनेते ललित कोल्हे यांनी सांगितले. दुपारी 1 वाजता सभापतीपदाच्या निवडीसाठी सभा सुरू झाली. या पदासाठी मनसेच्या बनसोडे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या शोभा बारी यांचा अर्ज होता. सभापती निवडीसाठी महिला व बाल कल्याण समितीमधील नऊ सदस्य मतदान करणार होते. त्यात खान्देश विकास आघाडीचे चार, मनसेच्या दोन, भाजपाचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक सदस्या यांना मतदानाचा अधिकार होता. अर्थातच मनसेला खान्देश विकास आघाडीचे समर्थन असल्याने मनसेचा उमेदवार निवडून येणे निश्चित होते. त्यात आकडय़ांची जुळवाजुळव करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस अपयशी झाल्याने निवड कार्यक्रमातून राष्ट्रवादी काँग्रेसने माघार घेतली. बारी यांचा अर्ज मागे घेण्यात आला व बनसोडे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल होत्या. उपायुक्त प्रदीप जगताप, प्रांत अभिजीत भांडे पाटील, नगरसचिव निरंजन सैंदाणे यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया झाली. मनसेच्या चौधरी अनुपस्थित महिला व बाल कल्याण समितीमधील मनसेच्या सदस्यांमध्ये मंगला चौधरी यांचा समावेश आहे. त्यांना मतदानाचा अधिकार होता. परंतु चौधरी या अनुपस्थित राहिल्या. महिला व बाल कल्याण समितीचे सभापतीपद मनसेकडेच होते. या वेळेसही ते मनसेकडे गेले आहे. मावळत्या सभापती पद्मा सोनवणे यांच्याकडून नूतन सभापती बनसोडे यांनी पदभार स्वीकारला. 11 व्या बाल कल्याण सभापती बनसोडे या बाल कल्याण समितीच्या 11 व्या सभापती आहे. मीनाक्षी सरोदे या पहिल्या सभापती होत्या.
‘राष्ट्रवादी’च्या माघारीने खुशबू बनसोडे बिनविरोध
By admin | Updated: October 16, 2015 00:47 IST