नांदेड, ता. धरणगाव : पावसाअभावी नांदेडसह परिसरात भयावह स्थिती निर्माण झाली आहे. चांगला पाऊस पडावा यासाठी येथील युवकांनी महादेवाच्या मंदिरातील पिंडीचा गाभारा पाण्याने भरून महादेवाला साकडे घातले. ८ रोजी सकाळपासून दुपारपर्यंत येथील गावातील पंधरा ते वीस युवकांनी गावाजवळील तापी नदीवरून डोक्यावरून पाणी आणत गावठाण चौकालगतच्या श्रीराम मंदिराजवळील महादेवाचे मंदिर पाण्याने पूर्ण भरत चांगला पाऊस यावा यासाठी महादेवाला साकडे घातले.
पावसाअभावी या परिसरात भयावह स्थिती निर्माण झाली आहे. खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत तर काही शेतकऱ्यांनी जून महिन्यात झालेल्या अत्यल्प पावसामुळे पेरण्या केलेल्या आहेत. त्यानंतर पाऊसच न आल्याने बियाण्यांना फुटलेले अंकूर जळून केलेली पेरणीही वाया गेली आहे. सकाळपासून या भागात उन्हाळ्यासारखे अतिशय कडक ऊन पडत अधूनमधून पावसाचे वातावरण निर्माण होते, पण पाऊस पडत नाही. आता अमावस्येला तरी चांगला दमदार पाऊस होईल, या आशेवर शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.