लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : शहरातील मोकाट डुकरांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून, सात दिवसांच्या आत मोकाट डुकरांची विल्हेवाट लावावी; अन्यथा फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्याधिकाऱ्यांनी सहा डुकरे मालकांना नोटीसद्वारे दिला आहे.
पावसाळ्याचे दिवस असल्याने आधीच प्रत्येक प्रभागात चिखल झाला आहे. मोकाट डुकरे नागरिकांच्या घरात शिरून घाणीचे साम्राज्य वाढवत आहेत. तसेच लहान मुलांनाही चावा घेत आहेत. शहरात कोरोना, स्वाईन फ्लूसह विविध साथीच्या रोगांची शक्यता आहे. मोकाट डुकरांमुळे गंभीर आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी डुकरे हलवण्याची नोटीस दिली होती. मात्र, तरीही डुकरे मालकांनी डुकरे गावाबाहेर हलवली नाहीत. डुकरे गल्लीबोळात वावरत असल्याने दुर्गंधी पसरून रस्त्यास अडथळा निर्माण होत आहे. म्हणून पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी ठाकूर मुनिर फथ्रोड, नरेश कालू कल्याणे, आकाश संजय धापद्वारा भरत हरचंद धाप, राजेश टिल्लू जाधव द्वारा सनी राजेश जाधव, किशोर वजीर जाधव द्वारा विक्रम किशोर जाधव, लखन मनोज कलोसे यांना नोटीस बजावल्या आहेत.