भुसावळ : माजी आमदार संतोष चौधरी यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी पालिका कर्मचाऱ्यांनी मंगळवारी निदर्शने केली.
माजी आमदार संतोष चौधरी व नगरपालिका मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्यात जोरदार शाब्दिक वाद होऊन प्रकरण शिवीगाळपर्यंत गेले. यानंतर शासकीय कामात अडथळा आणला म्हणून चिद्रवार यांनी चौधरींविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री गुन्हा दाखल केला होता. चौधरी यांच्यावर कारवाई करावी यासाठी पालिका कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली.
चौधरी यांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पालिका कार्यालयाच्या आवारात निदर्शने केली. चौधरी यांना अटक न झाल्यास कामबंद करण्याचा इशारा देण्यात आला.
यावेळी लेखाधिकारी विनोद चावरिया, कार्यालय अधीक्षक, महेंद्र कातोरे, लेखा परीक्षक अॅड.तृप्ती भामरे, लेखापाल सुदर्शन शमनानी, नगर रचनाकार शुभम खानकर, शेख परवेज, प्रशासकीय अधिकारी रामदास म्हस्के, चेतन पाटील, लोकेश ढाके, अनिल गवारे, संदीप पवार, वसंत राठोड आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या घटनेमुळे शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे.