जळगाव : महावितरणकडून वीजचोरीविरुध्द धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याअंतर्गत गुरुवारी पन्नास वीजजोडण्यांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत दोन जण वीजचोरी करताना आढळून आले आहे.
मागील काही दिवसांपासून महावितरणचे अभियंता सुरेश पाचंगे व त्यांच्या पथकाकडून शहरातील वीजचोरीविरुध्द मोहीम राबविली जात आहे. गुरुवारी रामनगर, शेरा चौक, आर.एन. पार्क व एमआयडीसीतील एम सेक्टर भागात पथकाकडून तपासणी करण्यात आली. तपासणीत भुसावळ महामार्गाजवळील भूमी कवच यांच्या मालकीच्या सिमेंट ब्लॉक बनविणाऱ्या प्रमोद पाटील, भरत पाटील यांना जमिनीखाली शंभरफूट सर्व्हिस केबल टाकून व्यावसायिक वीजचोरी करताना पथकाने पकडले. शेरा चौक परिसरातील रिझवान अली यांची आकोडा टाकून वीजचोरी केली तर नौशाद पटेल यांची थकबाकीमुळे वीज तोडणी केलेली असतानासुध्दा ती वीज सुरू केल्याचे आढळून आले. पथकाने सबंधितांवर वीजचोरी अधिनियम १३५ नुसार कार्यवाही सत्र जारी केले आहे. संबंधितांनी दोन दिवसात वीजचोरी बिले न भरल्यास फौजदारी कार्यवाही केली जाणार आहे. तसेच पथकाने रामनगर परिसरातील वीज मीटर पेटीला सील बंद केले.