लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : फ्रंटलाइन वर्कर्सचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी महावितरण कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी सोमवारपासून काम बंद आंदोलन पुकारले असून, मंगळवारीही आंदोलन सुरूच होते. दरम्यान, शासनाकडून जोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कामगार संघटनांनी घेतला आहे.
महवितरणमधील सहा संघटनाच्या संयुक्त कृती समितीने शासनाला नोटीस देऊनही वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाइन वर्कर्सच्या दर्जासह इतर मागण्या मान्य करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे कृती समितीतर्फे आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले आहे. सोमवारी या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर तर काही पदाधिकाऱ्यांनी दीक्षितवाडीतील कार्यालयासमोर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून काम बंद आंदोलन केले. तसेच मंगळवारी पुन्हा काम बंद आंदोलन करण्यात आले. दरम्यान, जोपर्यंत वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत बेमुदत कामबंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कृती समितीने केला असल्याचे सबाॅर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष पराग चौधरी यांनी कळविले आहे. मात्र, नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी वीजपुरवठा सुरू ठेवण्याबाबत अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आली असल्याचेही त्यांनी कळविले आहे.