लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पूर्णत: नॉनकोविड यंत्रणा सुरू करून कोविडबाधित व संशयित रुग्णांची व्यवस्था ही तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन मोहाडी रुग्णालयात करावी, असा प्रस्ताव जीएमसीच्या वैद्यकीय परिषदेकडून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना देण्यात आला आहे. नॉनकोविड यंत्रणेबाबत वैद्यकीय परिषदेच्या बैठकीत शनिवारी चर्चा झाली.
कोविड रुग्णांची संख्या घटली असून, आता गंभीर रुग्णही कमी झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात काहीच रुग्ण उपचार घेत असल्याने आता या ठिकाणी नॉनकोविड यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. नॉनकोविडसंदर्भात कॉलेज काउन्सिलने आपला अभिप्राय पाठविण्याचे पत्र जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले होते. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यात सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते. यात नेमके काय करता येऊ शकते, आगामी लाटेबद्दल काय वाटते, यावर एकत्रित चर्चा करण्यात आली. यानंतर अहवाल तयार करण्यात आला आहे. हा अहवाल कोविड व संशयित रुग्णांवर मोहाडी रुग्णालयात उपचार व्हावेत, असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे नॉनकोविड यंत्रणा सुरू करण्याबाबत ‘जीएमसी’च्या कॉलेज काउन्सिलने सहमती दर्शविल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून, आता जिल्हाधिकारी राऊत यावर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
दुसऱ्या लाटेत मिळाला कमी वेळ
दुसऱ्या लाटेची सुरुवात झाल्यानंतर काही उपाययोजना होण्याच्या आतच झपाट्याने रुग्णसंख्या वाढून सर्वच यंत्रणा ढासळली होती. ‘जीएमसी’मध्ये डॉक्टर उपलब्ध नसल्याने नेमके कोविड कुठे व नॉनकोविड कुठे हा मोठा संभ्रम या काळात निर्माण झाला होता. त्या काळात बेड उपलब्धतेचा मुद्दा समोर आला होता. अखेर मार्च महिन्यात पूर्ण रुग्णालय कोविड करण्यात आले. दुसऱ्या लाटेत अत्यंत कमी वेळ मिळाल्याने आता तिसऱ्या लाटेत यंत्रणा तातडीने नॉनकोविड करण्याची घाई करणार नाही, असाही एक सूर समोर येत आहे.