जळगाव : सतत डोळ्यासमोर असणारी मुलगी अचानक गायब झाल्याने कासाविस झालेल्या आईने तिचा राहत असलेल्या भागात शोध घेऊन गल्ली पिंजून काढली. कुठेच काहीच माहिती मिळत नसल्याने थेट रेल्वे स्टेशन गाठले. चार तास होऊन मुलगी सापडत नसल्याने आईच्या मनात नको ते विचार यायला लागले. निराश होऊन पुन्हा घराकडे शोध घेत असतानाच मुलगी हरिविठ्ठल नगरातील नाल्याच्या पाईपात मृतावस्थेत आढळली. तिला पाहून या मातेने एकच हंबरडा फोडला, हे दृश्य पाहून उपस्थितांनाही अश्रू आवरता आले नाही. गायत्री सुरेश खैरनार (वय १४) असे या मुलीचे नाव आहे.
हरिविठ्ठल नगरात सुरेश श्यामराव खैरनार उर्फ मिस्तरी यांना मनिषा, माधुरी, सरला, गायत्री व दुर्गा या पाच मुली असून त्यापैकी तिघींचे लग्न झालेले आहे. तर गायत्री (१४) व दुर्गा (वय १२) यांच्यासह वास्तव्याला आहेत. गायत्री ही मानसिक रुग्ण होती. समाजात घडत असलेल्या वाईट घटना व तिची मानसिक स्थिती पाहता आई, वडील तिच्यावर सतत लक्ष ठेवूनच होते. बुधवारी सकाळी १० वाजता आई घरात व वडील कामावर असताना गायत्री अचानक गायब झाली. त्यामुळे आई सीमा हिने तिचा लगेच शोध सुरू केला. ओळखीच्या तसेच नातेवाईकांकडेही चौकशी केली मात्र तरीदेखील काहीच माहिती मिळाली नाही. शेजारीच रेल्वे रुळ असल्याने त्या दिशेनेही आईने धाव घेतली. त्याच रुळावरून रेल्वे स्टेशन गाठले. मात्र मुलगी सापडेना. त्यामुळे आईच्या मनात नको त्या शंका येऊ लागल्या, चिंता वाढली होती. या विचारातच अर्धे शहर तिचा शोध घेतला. शेवटी सीमा या पुन्हा घराकडे शोध घेत असताना रेल्वे पुलानजीकच्या नाल्यात एक मुलगी मृतावस्थेत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तिकडे धाव घेतली असता ती मुलगी गायत्रीच असल्याचे दिसताच आईने एकच हंबरडा फोडला. शेजारील लोकांनी पोलिसांना घटनेची माहिती कळविली. मुलीला बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात हलविले, तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. आरएमएस कॉलनीतील पुलाजवळ पावसामुळे तिचा पाय घसरला असावा व त्यात ती नाल्यात पडून पाण्यात वाहत आल्याची शक्यता नागरिकांनी वर्तविली होती.