महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघामार्फत भडगाव येथे प्रकल्प कार्यालयात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी त्यांचे नादुरुस्त झालेले सर्व मोबाइल परत केले. इतर सर्व मागण्यांबाबतचे निवेदन प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी एस. बी. चौधरी यांना देण्यात आले.
याप्रसंगी संघाचे संघटक सचिव भानुदास पाटील, मीराबाई पाटील, मीना पाटील, सुनीता खजुरे, सुनीता महाजन, संगीता जळे, उज्ज्वला बागुल, वसुंधरा पाटील, साजेदा शेख, नीता पवार, रंजना सोनार, लीलाबाई पाटील सहभागी झाल्या होत्या.
शासकीय कामासाठी आम्हाला २०१९मध्ये मोबाइल देण्यात आले होते. या मोबाइलची वाॅरंटी दोन वर्षांची असून ती मे २०२१मध्ये संपली आहे. हा मोबाइल अवघ्या दोन जी.बी. रॅमचा आहे. त्याची क्षमता कमी असून यामध्ये लाभार्थ्यांच्या भरावयाची माहिती खूपच मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे हे मोबाइल हँग होतात. लवकर गरम होणे, चार्जिंग न होणे असे अतिशय निकृष्ठ दर्जाचे हे मोबाइल आहेत. त्यांच्या दुरुस्तीसाठी ३ हजारापासून ते ८ हजारापर्यंत खर्च येतो. तो अंगणवाडी सेविकांकडून घेतला जातो.
केंद्र शासनाने अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅक्टर ॲप दिले आहे. शासनाने दिलेल्या मोबाइलमध्ये हे ॲप डाऊनलोड होत नाही. त्यामुळे सेविका यांना स्वत:च्या मोबाइलमध्ये डाऊनलोड करावे लागते. हँडसेटमध्ये भरावयाची माहिती मराठी भाषेतून असावी. त्यामुळे सर्व माहिती सेविकांना तातडीने भरता येऊ शकते. इंग्रजी भाषेमध्ये माहिती भरण्यास बऱ्याच अडचणी येतात. तसेच आम्हाला नवीन चांगले अद्ययावत मोबाइल हँडसेट मिळावेत, या मागण्यांसाठी जळगाव जिल्ह्यातील भडगाव प्रकल्पासह सर्व प्रकल्पात आंदोलन केले जात आहे.