जळगाव: पाळधीकडून घरी परत येत असतांना जैन इरिगेशनजवळ खड्यात दुचाकी (एम.एच.१९ बी.एक्स.९९९) गेल्याने झालेल्या अपघातात आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांचा मुलगा आदर्श (वय १९,रा.जळगाव) हा ठार झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री पावणे दोन वाजेच्या सुमारास घडली. आदर्श व त्याचे काही मित्र जेवणासाठी पाळधी येथे गेले होते. तेथून परत येत असतांना हा अपघात झाला. मुंबईला निघालेले आमदार सोनवणे हे इगतपुरीपासूनच परत फिरले. सकाळी साडेअकरा वाजता आदर्शवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.रुग्णालयात केले मृत घोषितजैन कंपनीच्या तीन नंबर गेटच्या समोर हा अपघात झाला. महामार्गावरील खड्डयामुळे तोल सुटल्याने आदर्शने ब्रेक दाबला. त्यामुळे दुचाकीने तीन पलटी घेतली. त्यात त्याच्या डोक्याला जोरदार मार लागला. अपघात झाल्याचे लक्षात येताच जैन इरिगेशन कंपनीच्या चौधरी नावाच्या सुरक्षा रक्षकाने मुख्य प्रवेशद्वाराला ही घटना कळविली. त्यांनी लागलीच पाळधी पोलिसांना ही माहिती दिली. अर्ध्या तासाच्या आत पोलीस कॉन्स्टेबल खुशाल पाटील व रमेश पाटील हे रुग्णवाहिका घेवून घटनास्थळावर पोहचले. आदर्शच्या डोक्यातून प्रचंड रक्तस्त्राव सुरु होता. उजव्या बाजुला कानाच्यावर डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. दोघांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.आमदार सोनवणे परतले इगतपुरीहूनआमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे हे सोमवारी रात्री नऊ वाजता मुंबईसाठी जळगावहून रेल्वेने निघाले. रात्री दोन अडीच वाजेच्या सुमारास इगतपुरीत पोहोचत असतांनाच पत्नी लता सोनवणे यांनी त्यांना अपघाताची माहिती दिली. ते लागलीच तेथून एका वाहनाने माघारी परतले. रस्त्यात नाशिकला वैद्यकीय शिक्षण घेत असलेले मोठा मुलगा व मुलगी यांना सोबत घेवून सकाळी नऊ वाजता थेट जिल्हा रुग्णालय गाठले .
आमदार पुत्राचा अपघातात मृत्यू
By admin | Updated: October 7, 2015 00:42 IST