जळगाव : अभियांत्रिकी, औषधीनिर्माणशास्त्र व कृषी तंत्रज्ञान या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेशासाठी आवश्यक एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षा सोमवारपासून प्रारंभ झाली. पहिल्या दिवशी १ हजार ३९२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत अभियांत्रिकी, औषधीनिर्माणशास्त्र व कृषी तंत्रज्ञान या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी २० ते २५ सप्टेंबर या कालावधीत पीसीएम ग्रुप व २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत पीसीबी ग्रुपची परीक्षा जळगाव शहरात सकाळी ७.३० ते दुपारी १२ प्रथम सत्र व दुपारी १२.३० ते सायंकाळी ६.४५ द्वितीय सत्र, अशा या दोन सत्रांत जळगाव शहरातील एकूण ६ परीक्षा केंद्रांवर पार पडणार आहे. सोमवारी परीक्षेला सुरुवात झाली. यावेळी १ हजार ३९२ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती.
असे आहेत केंद्र (कंसात विद्यार्थी हजर संख्या)
जी.एच. रायसोनी महाविद्यालय (२६७), गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज (२३४), केसीई इंजिनिअरिंग कॉलेज (१७६), आयएमआर महाविद्यालय (२३६), मूळजी जेठा महाविद्यालय (२३९), एसएस सिस्टिम, पाळधी (२४०).
केंद्रांच्या १०० मीटर परिसरात प्रवेश नाही.
बारावीची लेखी पुरवणी परीक्षा १६ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर व दहावी पुरवणी लेखी परीक्षा २२ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत होत आहे, तर २० सप्टेंबरपासून एमएचटी सीईटीची परीक्षा प्रारंभ झाली आहे. त्यामुळे १६ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबरपर्यंत पेपर सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंतच्या कालावधीसाठी जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांच्या शंभर मीटर परिसरात कोणीही प्रवेश करू नये. परीक्षा केंद्राजवळील शंभर मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन/एसटीडी/आयएसडी/ फॅक्स केंद्र/ झेरॉक्स दुकाने, संगणक दुकाने व ध्वनिक्षेपक पेपर सुरू असलेल्या कालावधीसाठी बंद ठेवावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.