लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या पाहता लवकरच खासगी कोविड केअर सेंटर देखील सुरू होऊ शकतात. त्यासाठी या आधी ज्यांनी कोविड केअर सेंटर सुरू केले होते. अशांची बैठक जिल्हाधिकारी अभिजित राऊत घेणार आहे आहेत. त्यातील पाच ते सहा जणांनी कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे. सध्या होमक्वारंटाईन रुग्ण जास्त आहेत. त्यांची संख्या कमी करून त्यांना सीसीसीमध्ये दाखल करण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.
जिल्ह्यात सध्या होम क्वारंटाईन रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. यातील बहुतेक रुग्ण लक्षणे नसल्याने घराबाहेरच फिरतात. त्यावर लक्ष देण्यासाठी एक कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहे. तेथील कर्मचारी रुग्णांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची चौकशी करतात. तसेच रुग्णाच्या आसपास नेमका कसला आवाज येत आहे. त्याचाही अंदाज घेत आहेत. त्यात जर रुग्ण घराबाहेर आहे असा संशय आला तर त्याची पुन्हा चौकशी केली जाते.
होम क्वारंटाईन रुग्णांना सीसीसीमध्ये हलविण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी लवकरात लवकर खासगी सीसीसी सुरू करण्याची तयारी प्रशासनाने सुरु केली असून त्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. ज्यांनी मागच्या काळात सीसीसी चालवले आहेत. त्यांची शुक्रवारी बैठक आयोजित करण्यात आली आहे.
प्रलंबित अहवालांची संख्या कमी करणार - जिल्हाधिकारी
कोरोनाचे सध्या खुप अहवाल प्रलंबित राहत आहेत. त्यावर उपाय म्हणजे दिवसभरात चाचणी करण्याची लॅबची क्षमता वाढवणे, त्यासाठी आरटीपीसीआर किट अधिक प्रमाणात मागवले गेले आहेत. आरएनए एक्स्ट्रॅक्टर किट देखील मागवण्यात आले आहे. ते आले की लॅबची क्षमता जवळपास ३० ते ४० टक्क्यांनी वाढेल. त्यासोबतच या आधी काही अहवाल हे खासगी लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले जात होते. ते आता बंद करण्यात आले आहे. त्याच्या काही तांत्रिक अडचणी होत्या. मात्र आता पुन्हा खासगी लॅबमध्ये नमुने पाठवण्यासंदर्भात प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.