जळगाव : सन २०१८ मध्ये नांदेड जिल्ह्यात उघडकीस आलेल्या कृष्णूर धान्य घोटाळ्याच्या धर्तीवर जळगावातसुद्धा वाहतूक ठेकेदार यांच्याशी संगनमत करून धान्याचा काळाबाजार सुरू असल्याची तक्रार अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाला प्राप्त झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दरम्यान, या तक्रारीची थेट राज्यमंत्र्यांनी दखल घेतली असून, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आज, बुधवारी सकाळी ११.३० वाजता त्यांच्या दालनात बैठक होणार आहे.
यावेळी बैठकीमध्ये जळगाव जिल्ह्यातील वाहतूकदार यांचा मागील तीन वर्षांचा जीपीएस डाटा जिल्हाधिकारी यांनी तपासून त्यामधील तफावतींवर चर्चा होणार आहे. शिवाय संबंधित जीपीएस पुरवठादार यांच्या प्रतिनिधीस देखील बोलविण्यात आले. त्याचबरोबर विविध टोलनाक्यांवर असलेल्या नोंदी व त्यामधील तफावत, पुरवठा अधिकारी यांनी दिलेल्या ईष्टांकानुसार केलेल्या तपासण्या व त्यामधील फरक, ठेकेदार यांची वाहने शासनाच्या निकषाची पूर्तता करतात काय? याबाबत आरटीओ यांचा अहवाल, जिल्ह्यामध्ये गेल्या तीन वर्षांत दाखल केलेल्या अत्यावश्यक वस्तू अधिनियमाच्या कलम (७) नुसार दाखल केलेले गुन्हे व त्यामध्ये पोलीस विभागाने केलेली कार्यवाही, आदींबाबत चर्चा होणार आहे.