जळगाव : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक दौऱ्यांतर्गत भाजपचे सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत शुक्रवार, २३ रोजी भाजप युवा मोर्चासह युवा वॉरिअर्स व हेल्थ वॉरिअर्सची बैठक होणार आहे. या वेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्यासह माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील हेदेखील उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, या बैठकीपूर्वी २२ रोजी संध्याकाळी ६ वाजता खोटेनगर थांब्याजवळ व मानराज पार्क या ठिकाणी भाजपा युवा मोर्चा शाखांचे उद्घाटन होणार आहे.
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक दौऱ्यांतर्गत चंद्रशेखर बावनकुळे, विक्रांत पाटील यांचे धुळे, नंदुरबार दौऱ्यानंतर जळगाव जिल्ह्यात आगमन होणार आहे. यामध्ये २२ रोजी संध्याकाळी ६ वाजता खोटेनगरनजीक महिला आघाडी व मंडळातर्फे स्वागत होणार आहे. तसेच शाखांचे उद्घाटन होणार आहे.
शुक्रवारी बैठका
शुक्रवारी सकाळी ९.१५ वाजता चंद्रशेखर बावनकुळे व विक्रांत पाटील हे शिवतीर्थ मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणार असून ९.३० वाजता भाजप जिल्हा कार्यालयात पत्रकार परिषद होणार आहे. १०.१५ वाजता ब्राह्मण सभा सभागृहात जळगाव महानगर व ग्रामीण युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर ११.१५ वाजता युवा वॉरिअर्स हेल्थ वॉरिअर्स यांची बैठक होणार आहे.
शाखा उद्घाटन व इतर कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद सपकाळे यांनी केले आहे.