जळगाव : शहरातील नाट्यकलावंताच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या बालगंधर्व खुल्या नाट्यगृहाच्या सुशोभिकरणासाठी महापौर सीमा भोळे यांनी पुढाकार घेतला आहे. ‘लोकमत’ ने मराठी रंगभूमी दिनाच्या पार्श्वभूमीवर बालगंधर्व नाट्यगृहाच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधले होते. याच वृत्ताची दखल घेत महापौरांनी आता मनपा आर्किटेक्ट पॅनलशी चर्चा करून, नाट्यगृह सुशोभिकरणाचा निर्णय घेतला आहे.महापौर सीमा भोळे यांनी बुधवारी मनपा आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांना पत्र पाठविले आहे. या पत्रात म्हटले आहे की, गत काळापासून नगरपालिका अस्तित्वात असल्यापासून शहराच्या मध्यास्थित असलेले बालगंधर्व खुले नाट्यगृह शहरातील नाट्य कलावंत व नाट्यप्रेमींसाठी आजही बालगधंर्व खुले नाट्यगृहाचे विशेष महत्त्व आहे. आजही नाट्यगृहात विविध नाट्य प्रयोग, कार्यक्रम होत असतात. सद्यस्थितीत नाट्यगृहाची स्थिती जिर्ण झालेली असून यास्तव शहरातील नाट्यप्रेमी, नाट्यकलावंत व नागरीकांनी याबाबत नाराजी व्यक्त केलेली आहे. परिणामी सदर नाट्यगृहाचे नुतनीकरण, सुशोभिकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी मनपाने गठीत केलेल्या वास्तुविशारद संघ (आर्किटेक्ट पॅनल) व्दारे बालगंधर्व खुले नाट्यगृहाचे नुतनीकरण बंदिस्त किंवा कसे सुशोभित करता येईल याबाबत सबंधीतांसोबत चर्चा करुन हे नाट्यगृह सुशोभिकरण करण्याची कार्यवाही करावी अशा सूचना महापौरांनी दिल्या आहेत.शहरात अतीवृष्टी झाल्याने ठिकठिकाणी डबके साचले आहे. डासाचा प्रादुर्भाव वाढल्याने साथीचे आजार बळावण्याची शक्यता आहे. त्यामुळे महानगरपालिका दवाखान्यांमध्ये मुबलक औषधीसाठा उपलब्ध करुन ठेवावा. शहरात सर्व प्रभागात धुर व औषध फवारणी करावी अशा सूचनाही महापौरांनी आयुक्तांना दिल्या आहेत.
बालगंधर्व नाट्यगृह सुशोभिकरणासाठी महापौरांनी घेतला पुढाकार...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 21:14 IST