लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : सध्याच्या काळात प्रत्येकाची जीवनशैली अत्यंत धकाधकीची आणि ताणतणावाची झाली आहे. ताणतणावाला सामोरे जाताना अनियमित वेळापत्रकामुळे व्यायाम, आहाराकडे आणि पर्यायाने तब्येतीकडे दुर्लक्ष होते. याची परिणती मधुमेह, रक्तदाब, स्थूलता, असे आजार बळावण्यामध्ये होते. यासाठी चाळीसगावात आरोग्य जनजागृतीची चळवळ गेल्या अनेक वर्षांपासून काही समाजसेवकांनी सामाजिक बांधीलकीच्या दृष्टिकोनातून उभी करून सुरूच ठेवली आहे.
अकरा वर्षांपासून महिलांसाठी आरोग्य चळवळ : डॉ. उज्ज्वला देवरे
२०१० पासून आजतागायत महिलांसाठी स्वतंत्र योग अभ्यासवर्ग स्त्रीरोग डॉ. उज्ज्वला देवरे यांनी नि:शुल्क सुरू केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून योग दिनानिमित्त महिलांसाठी विविध स्पर्धा व कार्यक्रम त्या घेत आहेत. महिलांना मानसिक, शारीरिक व्याधीतून सुटका करण्यासाठी योगसाधना, सूर्यनमस्कार, प्राणायाम करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांचे कार्य गेल्या अकरा वर्षांपासून सकाळी ५.३० ते ७.०० वाजेपर्यंत नियमितपणे सुरू आहे.
हजारो लोकांना प्राणायामाचे प्रशिक्षण : प्रा. एस.जे. पवार
योग ऋषी स्वामी रामदेव महाराज यांचे परमशिष्य म्हणून ओळखले जाणारे निवृत्त प्राध्यापक एस.जे. पवार यांनी २००६ पासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विनामूल्य प्राणायाम शिबिरांचे आयोजन करून आतापर्यंत हजारो लोकांना प्राणायामाचे प्रशिक्षण दिले. जळगाव जिल्हा पतंजली योग समिती प्रथम अध्यक्ष, नाशिक मंडळ प्रभारी म्हणून त्यांनी धुरा सांभाळली. अमेरिकेत अनेक ठिकाणी योग शिबिरे घेऊन जळगावचे नाव साता समुद्रापार पोहोचणारे, जळगाव जिल्ह्यात योगाची मुहूर्तमेढ रोवणारे प्रा. पवार हे आयुष मंत्रालय, भारत सरकारची आंतरराष्ट्रीय योग शिक्षक वायसीबी लेव्हल-३ ही परीक्षा उच्च श्रेणीत नुकतेच उत्तीर्ण झाले आहेत.
अनेकांना योगाचे शिक्षण : प्रा. नारायण मांडवणे
निवृत्त प्रा. नारायण गोविंदा मांडवडे यांनी २००६ मध्ये पतंजली योगपीठ हरिद्वार येथे स्वामी रामदेव महाराज यांच्या सान्निध्यात योग प्रशिक्षण घेतले. नाशिक विभागात २५० पेक्षा अधिक सहादिवसीय योग, प्राणायाम शिबिरे त्यांनी घेतली. तसेच शाळा, महाविद्यालयांमध्ये योग, प्राणायाम या विषयावर व्याख्यानेही त्यांनी दिली. पाचोरा येथे ते दरवर्षी योगदिनी विद्यार्थ्यांचा योगाभ्यास घेतात. याबरोबरच ते आयुर्वेदाविषयी माहिती देतात.
===Photopath===
200621\20jal_13_20062021_12.jpg~200621\20jal_14_20062021_12.jpg
===Caption===
डॉ. उज्ज्वला देवरे प्रा. नारायण मांडवणे~डॉ. उज्ज्वला देवरे प्रा. नारायण मांडवणे