मोर्चा काढून केला मनपाचा निषेध : दुरुस्ती करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील खराब झालेल्या रस्त्यांचा प्रश्नावर बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. शहरातील रस्त्यांची स्थिती अतिशय खराब झाली असून, नागरिक या रस्त्यांमुळे त्रस्त झाले असतानाही कुठलीही दुरुस्ती महापालिकेकडून केली जात नसल्याने महापालिका प्रशासनाचा या मोर्च्याच्या माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्य पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. चित्रा चौक, टॉवर चौक मार्गे हा मोर्चा महापालिकेवर काढण्यात आला. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे यांच्यासह योगेश पाटील, कुणाल पाटील, पंकज चौधरी, तुषार पाठक, संदीप मांडोळे, कुणाल पवार, भूषण राऊत, धनंजय चौधरी, कृष्णा बारी, समाधान पाटील आदी उपस्थित होते. यावेळी मनविसेकडून मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. शहरातील बिघडलेल्या रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे, तसेच महिन्याभरात रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मनविसेकडून देण्यात आला आहे.