आकाश नेवे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव :
आई एक नाव असतं ।
घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं।।
सर्वांत असते तेव्हा जाणवत नाही।
आता नसली कुठंच तरी नाही म्हणवत नाही।।
प्रसिद्ध कवी फ.मुं. शिंदे यांनी आईचे मानवी जीवनातील महत्त्व या कवितेद्वारे अधोरेखित केले आहे. सावदा येथील शिवाजी चौक परिसरात राहणाऱ्या हसऱ्या-खेळत्या परदेशी परिवारात कोरोनाने शिरकाव केला. एकापाठोपाठ एक सहा जणांचा बळी गेला. त्यात प्रतिभा कैलाससिंग परदेशी आणि कैलाससिंग परदेशी हे कुटुंबातील आधारवड कोरोनामुळे अकाली कोसळले. त्यांच्या मृत्यूनंतर मुलगा उद्धव आणि मुलगी शुभांगी यांच्यावरील मायेचा आधारवड उन्मळून पडला आहे. कोरोनामुळे सर्वस्व हिरावलेल्या परदेशी कुटुंबातील मोठा मुलगा उद्धव हाच धाकटी बहीण शुभांगीवर मायेची पाखर घालतोय.
जळगावच्या एका खासगी रुग्णालयात २६ एप्रिल रोजी प्रतिभा कैलाससिंग परदेशी यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या रुग्णालयात तब्बल ४० दिवस दाखल होत्या. त्या रुग्णालयात दाखल झाल्या मार्च महिन्यात. मात्र, त्यानंतर त्यांची प्रकृती खालावतच गेली. लाइफ सपोर्ट सिस्टिमवर असलेल्या प्रतिभा परदेशी यांनी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला. त्या आधी २५ मार्चला त्यांचे पती कैलाससिंग परदेशी यांनाही कोरोनानेच हिरावले होते. त्यांच्या जाण्याने २४ वर्षांचा उद्धव आणि २१ वर्षांची शुभांगी या पाखरांवर मोठा आघात झाला.
कोरोनानेच परदेशी यांच्या कुटुंबातील संगीता किशोरसिंग परदेशी, किशोरसिंग गणपतसिंग परदेशी आणि रामसिंग गणपतसिंग परदेशी यांना हिरावून नेले.
सध्या उद्धव पुण्यातील एका महाविद्यालयात एमबीए करीत आहे, तर शुभांगी जळगावच्या महाविद्यालयातून बीसीए करीत आहे. आईच्या जाण्याने आतूनच कोलमडून पडलेल्या उद्धव आणि शुभांगीला कुटुंबाने आधार दिला. आता सावरलेला उद्धवच तिच्यासाठी आई-वडिलांचे कर्तव्य पार पाडण्यासाठी तयार झाला आहे. उद्धवला आता नोकरी करून आपल्या बहिणीचे शिक्षण पूर्ण करायचे आहे. लॉकडाऊन संपल्यावर आधी तो नोकरी शोधणार आहे. त्यातूनच बहिणीचे भविष्य घडविणार आहे. माता-पित्याचे छत्र हरपले असले तरी उद्धव आणि शुभांगी हेच आता एकमेकांसाठी मातृ आणि पितृछत्र होऊन परस्परांना आधार देत आहेत.
कोट -
एकापाठोपाठ एक सर्वांच्या जाण्याने आमच्यावर मोठा आघात झाला आहे. कुटुंबातील इतर सदस्य सोबत आहेत. लहान बहीण शुभांगीदेखील आता सावरली आहे. सध्या लॉकडाऊनमुळे कुठेही नोकरीच्या नव्या संधी नाहीत. एकदा सारेकाही सुरळीत झाले की नोकरी करून बहिणीचे शिक्षण पूर्ण करणार आहे. - उद्धव परदेशी, सावदा.