शनिवारी रात्री दहापासून पावसाला सुरूवात झाल्यानंतर, पहाटेपर्यंत पावसाच्या सरी बरसल्या. पावसासोबत अधून-मधून जोराने वारा वाहात असल्यामुळे, शहरातील शिवाजीनगर, वाघनगर, रायसोनी नगर, मेहरूण, महाबळ, कांचननगर, जिल्हा क्रीडा संकुल परिसर व शहराच्या इतर भागात वीज पुरवठा खंडित झाला होता. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तांत्रिक कामे करून, काही ठिकाणी रात्रीच वीज पुरवठा सुरळीत केला. मात्र, काही भागात वारंवार ब्रेक डाऊनचे प्रकार घडल्यामुळे, रात्रभर या भागात विजेचा लंपडाव सुरू होता. यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला.
इन्फो :
ग्रामीण भागातही बत्ती गुल
रात्रीच्या पावसामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातही अनेक गावांमध्ये वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडले. यात शिरसोली, असोदा, विदगाव, भादली या भागांमध्ये रात्री पावसाला सुरूवात झाल्यानंतर लगेच वीज पुरवठा खंडित झाला होता. मुख्य वीज वाहिनीवरील ट्रान्सफाॅर्मरमध्ये बिघाड झाल्यामुळे रात्रभर या भागात वीज पुरवठा खंडित झाला होता. सकाळी लवकर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी काम हाती घेऊन, सकाळी सातपर्यंत वीज पुरवठा सुरळीत केला असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.