मोहाडी रस्त्यावरील दौलत नगरात पिंटू बंडू इटकर यांचा आलिशान बंगला आहे. त्यात ते पत्नी मनीषा व मुलगी हरिप्रिया (वय ३) यांच्यासह वास्तव्याला आहेत तर वडील बंडू इटकर व आई जनाबाई कोल्हे हिल्स परिसरात वास्तव्याला आहेत. आई, वडील कधी बंडू यांच्याकडे तर कधी कोल्हे नगरात थांबतात. इटकर हे स्टीलचे होलसेल व्यापारी आहेत. जालना येथून माल घेऊन ते जिल्ह्यातील विक्रेत्यांना पुरवठा करतात. मंगळवारी रात्री घरात ते पत्नी व मुलगी असे तिघंच होते. मुख्य प्रवेशद्वारावरून उडी घेऊन दरोडेखोर बंगल्यात शिरले. वरच्या मजल्यावर आल्यावर त्यांनी काही तरी साहित्याने दरवाजाची कडी तोडली, त्यात लाकडी चीप बाहेर आली. आतमधून लावलेली कडीदेखील वाकल्याने दरवाजा सहज उघडला.
पिंटू व मनीषा यांनी ‘लोकमत’जवळ कथन केली आपबिती
पिंटू व मनीषा यांनी घडलेली घटना जशीच्या तशी ‘लोकमत’जवळ कथन केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, पहाटे ३.१५ वाजता सहा जण घरात आले. आधी वरच्या मजल्यावरील खोल्यांमध्ये कोणी आहे का? हे त्यांनी पाहिले, त्यानंतर खाली इतर खोल्यांची चाचपणी केली. हॉलच्या बाजूला असलेल्या बेडरूमध्ये झोपेतून आम्हाला उठविले. सर्व जणांनी अंगात स्वेटर व तोंडाला रुमाल बांधलेला होता तर एकाने काळ्या रंगाचे जोकर मास्क लावलेले होते. सर्व जण मराठी अर्थात खास करून जळगाव जिल्ह्यात बोलली जाणारी भाषा बोलत होते. एकाने चाकूसारखे लांब धारदार शस्त्र काढून मानेला लावले...आणि घरात काय माल आहे...त्यावर काहीच नाही सांगितले असता दुसऱ्याने पत्नी मनीषालाही शस्त्र लावले...जीव प्यारा आहे ना,..चला मग मुकाट्याने सोन्याचे दागिने, रोकड जे काही असेल ते काढा...नाही तर इथेच खेळ खल्लास...असा दम दिला. याचवेळी मुलगी रडायला लागल्याने दुसऱ्याने तिच्या गळ्याला चाकू लावला व तिला गप्प कर...नाही तर...अशी धमकी देत कपाटाच्या ड्राॅवरमध्ये ठेवलेले तीन लाख रुपये रोख व कपाटात ठेवलेले २० लाखँचे सोन्याचे दागिने काढून पिशवीत टाकले. जातांना दोघांजवळील मोबाइल हिसकावून घेत घरातून पळ काढला. जातांना मोबाइल खाली लोखंडी गेटजवळ ठेवले होते.