चाळीसगाव : भारतीय जनता पक्षात अंतर्गत गटबाजी आता चव्हाट्यावर येऊ लागली आहे. शहरात कोरोना लसीकरण शिबिरात भाजपच्या खासदारांसह विरोधी पक्षाच्या काही लोकांचे एकत्रित फोटो असल्याने यावरून नेमके समजायचे तरी काय? असा सवाल भाजप शहराध्यक्ष व नगरसेवक घृष्णेश्वर पाटील यांनी उपस्थित करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. यानिमित्ताने भारतीय जनता पक्षातील अंतर्गत दुफळी उफाळून आली आहे.
भाजपमध्ये खासदार उन्मेश पाटील आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्यातील सुप्त संघर्ष हा कुणापासून लपून राहिलेला नाही. यात खुद्द पक्षाचे शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील यांनी खासदार उन्मेष पाटील यांना जाहीर पत्र लिहून या उद्रेकाला वाचा फोडली आहे. मंगळवारी हे खुले पत्र सोशल माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. घृष्णेश्वर पाटील यांनी या खुल्या पत्रामधून खा. पाटील यांच्या बाबतीतील काही गोष्टींवर बोट ठेवले आहे.
आगामी काळात पालिकेची निवडणूक असल्याने आतापासून आरोप - प्रत्यारोपाचा हा राडा सुरू झाल्याचा सूर शहरातून उमटला आहे. सद्यस्थितीत आरोग्य विभागाने सामाजिक संघटना व राजकीय कार्यकर्त्यांना मदतीला घेऊन कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिरे आयोजित करणे सुरू केले आहे. याच शिबिरांच्या बॕॅनरवर प्रभागातील कार्यकर्त्यांसोबत विरोधी पक्षाच्या व्यक्तींचेही फोटो घेतले असून घृष्णेश्वर पाटील यांच्या लेटरबॉम्बमध्ये याविषयी थेट नाराजी व्यक्त झाली आहे. बॕॅनरवर पक्षाचे चिन्ह घेतलेले नाही. प्रोटोकॉल न पाळता विरोधी पक्षाच्या काही लोकांचे फोटो घेतले आहेत. एकप्रकारे पालिका निवडणुकीतील उमेदवारच जाहीर केले का? असा प्रश्न चर्चिला जात असल्याचेही घृष्णेश्वर पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.
कोट
स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी कार्यकर्त्यांचा वापर पक्षातील जुन्या नेत्यांना बाजूला सारून नवीन लोक जोडले. आज जोडलेल्या या नवीन लोकांनादेखील बाजूला केले जात आहे. त्यांच्यासमोर पर्याय उभे केले जात आहे.
- घृष्णेश्वर पाटील, शहराध्यक्ष, भाजप