बोरगाव, ता.धरणगाव, जि.जळगाव : नव्वदी पार करून वृद्धापकाळाने रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला निधन झालेल्या भाऊरायाला शंभरीच्या वाटेवर असलेल्या वृद्ध बहिणीने राखी बांधून अखेरचा निरोप दिला. भाऊ-बहिणीचे ह्या नात्यातील प्रेम दर्शविणारा हा प्रसंग उपस्थितांचे हृदय हेलविणारा ठरला. मोघण, ता.धुळे येथे शनिवारी सायंकाळी ही घटना घडली.धरणगाव येथील रहिवासी मथाबाई रामलाल बन्सी (वय ९५) यांचे वृद्ध भाऊ धोंडू लाला सूर्यवंशी (वय ९२) रा.मोघण, ता.जि.धुळे यांचे रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला निधन झाले. ही दु:खद घटना माहीत पडताच वृध्दापकाळाने अपंगत्व आलेल्या बहिणीचा जीव भावाच्या अखेरच्या दर्शनासाठी कासाविस झाला. आईचे मन मुलगा ईश्वर बन्सी, शरदकुमार बन्सी यांनी जाणले. त्यांच्याही चार मामांपैकी एकट्या मयत धोंडू मामाने हयात असताना दिलेल्या प्रेमाने कृतज्ञ होते. तेव्हा तत्काळ मोघण गावाची वाट त्यांनी धरली.मोघण येथे बहिणीने भावाचे अखेरचे दर्शन घेतले व त्यांची मुले एकनाथ, अशोक, काशिनाथ रमेश अन् मुलगी हिराबाई यांचे अश्रू पुसून धीर दिला व रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या आपल्या भावाच्या या घटनेचे औचित्य साधून राखीचा धागा बांधून वृध्द भावाला वृध्द बहिणीने अखेरचा निरोप दिला.याप्रसंगी राष्ट्रीय चर्मकार संघाचे सचिव भिवसन अहिर े(धुळे), दिलीप शिलावट (मनमाड), काँग्रेसचे पारोळा तालुका अध्यक्ष पिरनकुमार अनुष्ठान, आरोग्य सभापती दीपक अनुठान, भाजपाचे नंदू पाखले, शिवसेनेचे संजय पाटील, मुख्याध्यापक कृष्णकांत माळी, भजनी मंडळाचे अध्यक्ष बापू माळी, गणेश समशेर यांच्यासह ग्रामस्थांनी उपस्थित राहून आदरांजली वाहिली.
शंभरीच्या वाटेवरील वृद्ध बहिणीने दिला नव्वदीच्या भावाला राखी बांधून अखेरचा निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 9:45 PM