फोटो :२५ व्हीडीटी ०६
गुढे, ता. भडगाव : खेडगाव येथील आयटीबीपी जवान सुनील यशवंत हिरे हे दिनांक २२ रोजी अरुणाचल येथे कर्तव्य बजावत असताना शहीद झाले. दिनांक २४ रोजी खेडगाव येथे लागून असलेल्या माळरानात त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी संपूर्ण तालुक्यातून मोठ्या संख्येने नागरिक हजर होते. आपल्या लाडक्या सुपुत्राला अश्रूनयनांनी मानवंदना गाव व परिसरवासीयांनी दिली. गावाच्या सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी खेडगावातील तरुण मित्र, विद्यार्थी, विद्यार्थिनी आबालवृद्ध व गावी सुट्टीवर आलेल्या जवानांनी तीन दिवसांपासून तयारी केली होती. फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरवरून अंतयात्रा काढण्यात आली. संपूर्ण गावात रस्त्यावर रांगोळ्या काढून फुलांनी सजवल्या होत्या.
अंत्ययात्रेदरम्यान ‘वीर जवान तुझे सलाम’ , ‘वीर जवान अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. संपूर्ण खेडगाव परिसरात शोककळा पसरली होती. सुनील हिरे हे २२ वर्षांपासून देशसेवेत कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, व एक १२ वर्षांचा तर एक आठ वर्षांचा मुलगा दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे. खान्देशातील निवृत्त झालेले सर्व माजी सैनिक तसेच सुट्टीवर घरी आलेल्या सैनिकांनी अंत्ययात्रेबाबत नियोजन केले. खान्देश रक्षक संस्थेच्या सदस्यांनी सहकार्य केले. तीन दिवसांपासून आपल्या लाडक्या सुपुत्राच्या अंत्यविधीच्या स्थळाची सजावट खेडगावकरांनी एक-दुसऱ्याला धीर देत केली होती.
अंत्यविधीसाठी वापरल्या गौऱ्या
अमळनेर गौशाळेच्या पर्यावरणपूरक गौऱ्यांनी अंत्यविधी पार पडला. आयटीबीच्या जवानांनी तसेच भडगाव पोलिसांच्या वतीने मानवंदना तसेच सलामी देण्यात आली. अखेरचा निरोप देण्यासाठी आमदार किशोर पाटील, प्रांत अधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सागर ढवळे,
पोलीस निरीक्षक अशोक उतेकर आदी उपस्थित होते. ते लोकमतचे वार्ताहर संजय हिरे यांचे चुलत भाऊ होत.