लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात ५ एप्रिलपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या कडक निर्बंधांचा आणि लसींच्या तुटवड्याचा परिणाम हा लसीकरणाच्या गतीवर झाला आहे. गेल्या शुक्रवारी पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण तब्बल १३ हजार ४९२ एवढे होते. तर बुधवारी फक्त ३,५९० एवढ्या लोकांनीच लस घेतली आहे.
जिल्ह्यात जवळपास २५० लसीकरण केंद्रे आहेत. मात्र सध्या कोविशिल्ड या लसीचे डोस उपलब्ध नाहीत. त्यामुळे ज्या केंद्रांवर कोविशिल्ड ही लस दिली होती ती केंद्रे बंद करण्यात आली आहेत. तर ही लस उपलब्ध नसल्याने अनेकांनी लसीकरण करून घेण्यास नकार दिला आहे. सध्या कोव्हॅक्सिन उपलब्ध आहे.
जिल्ह्यातील बहुतेक लसीकरण केंद्रांवर आतापर्यंत कोविशिल्ड हीच लस दिली होती. त्यामुळे आता ही केंद्रे बंद आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या जवळचे रेडक्रॉसचे केंद्रही बुधवारी बंद होते. तसेच जिल्ह्यातील बहुतेक केंद्रे बुधवारी आणि गुरुवारी बंद होती. जिल्ह्यासाठी साडेतीन हजार कोव्हॅक्सिनचे डोस बुधवारी सायंकाळपर्यंत शिल्लक होते. त्यामुळे आता लसीकरणाची गती मंदावली आहे.
मागील आठवड्यात झालेले लसीकरण
पहिला डोस दुसरा डोस
सोमवार ७,७५९ ५९४
मंगळवार ४,४०२ ४१०
बुधवार २,१८९ २६४
गुरुवार २,०६७ १८४
शुक्रवार १३,४९२ ४३५
शनिवार ८,२२८ ४३५
या आठवड्यातील लसीकरण
सोमवार ७,७३८ ४७७
मंगळवार ३,६५३ ६५५
बुधवार ३,५९० ४१५
लसीकरण केंद्रांवर जाऊन आलो; पण तेथे लसच शिल्लक नव्हती. आता परत यावे लागले. आधीच लॉकडाऊन सुरू आहे. विनाकारण फिरणे धोक्याचे आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर लस उपलब्ध करून द्यावी
- प्रकाश नेवे
लस घेण्यासाठी बाहेर जावे का, हा प्रश्न आहे. बाहेर जावे तर कडक निर्बंध आणि त्यातच लसदेखील उपलब्ध नाही. त्यामुळे आम्ही घरातच आहोत.
- शांताराम पाटील
असे झाले आहे लसीकरण
४५ - ६० वर्ष : पहिला डोस - २४,९३३, दुसरा डोस - १५७
६० वर्षांवरील : पहिला डोस ७४,४३९, दुसरा डोस - ३७२
आरोग्य कर्मचारी : पहिला डोस - २४,२९१, दुसरा डोस - १०,०९१
फ्रंटलाइन वर्कर : पहिला डोस - २२,३२२, दुसरा डोस - ६,०४७
एकूण लसीकरण : पहिला डोस १,६१,२०१, दुसरा डोस १८,२७२
खासगी रुग्णालये : पहिला डोस २६,९३२, दुसरा डोस ७७१