केऱ्हाळे,ता. रावेर : नुकसान भरपाईस पात्र केळी उत्पादक लाभार्थी शेतकऱ्यांना पैसे देण्यास असमर्थ ठरलेल्या पीकविमा कंपनीने आता कृषी विभागाला पुढे करून अयशस्वी ठरल्याचे खापर बँकांवर फोडून आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या प्रशासकीय यंत्रणेच्या खेळात शेतकऱ्यांचे काटेलोचन होत आहे. याची जाणीव ठेवणे गरजेचे झाले आहे. असंख्य शेतकरी अद्यापही वाऱ्यावर असून रकम मिळण्यासाठी लाहीलाही झालेल्या शेतकऱ्यांना नऊ महिने उलटून देखील वाटच पहावी लागत आहे.
सन २०१९/२० च्या केळी पीकविमा घेणाऱ्या कंपनीकडून भरपाई मिळवून देण्यासंदर्भात सर्व संबंधित असलेल्या विभागाने आटोकाट प्रयत्न केले असता देखील या विषयाला अद्यापही पूर्णविराम मिळत नसल्याने यामध्ये खरा ‘खलनायक’ कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
तर कमाल व किमान तापमानाच्या
भरपाईची रक्कम कशी वर्ग झाली
वादळी नुकसानीची रक्कम मिळण्याबाबत बँका विलंब करीत आहेत असा आरोप कृषी विभाग व विमा कंपनी करत असेल तर ते धादांत खोटे असल्याचे उघड होत आहे . कारण कमाल व किमान तापमानाच्या नुकसान भरपाई पोटी मिळणारी रक्कम न चुकता सर्व शेतकऱ्यांना बिना दिक्कत याच बँकांकडून शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती तेव्हा बँका बरोबर होती का? जर एखाद दुसऱ्या बँकेची अडचण असल्यास बाकी सर्व बँकांना जबाबदार धरण्यामागचे कारण काय? असा प्रश्न विचारला जात आहे.
विमा संरक्षण घेते वेळी विमा कंपनी बँकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची खात्यासंदर्भात इत्यंभूत माहीत घेत असते . त्यामुळे खाते नंबर चुकीचे असल्याचे कारण पुढे करून दिशाभूल करणे याठिकाणी योग्य ठरणार नाही.
केऱ्हाळे येथील बँकेत अजूनही कंपनीकडून संपर्क नाही
याबाबत केऱ्हाळे येथील युनियन बँक प्रबंधकास विचारले असता आता पर्यंत सन २०१९/२० च्या पीकविमा कंपनी कडून खाते नंबर अथवा शेतकरी संदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती तथा पत्रव्यवहारद्वारे करण्यात आलेला नाही.