अजय पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील रस्त्यांची एकीकडे वाट लागली असताना दुसरीकडे शहरातील मुख्य रस्त्यांच्या हद्दीवरून मनपा व बांधकाम विभागाकडून टोलवा-टोलवी सुरू आहे. मुख्य भागातून जाणाऱ्या २० किमीचे रस्ते मनपाकडून बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्याचा शासन निर्णय ४ मे २०१७ रोजी झाला आहे. मात्र, मनपाने अजूनही हे रस्ते बांधकाम विभागाकडे हस्तांतरित केले नसल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात येत आहे, तर मनपा प्रशासन याबाबत अभ्यास सुरू असल्याचे उत्तर देत आहे. मनपा व पीडब्ल्यूडी प्रशासनाच्या पोरखेळात मात्र जळगाकर भरडले जात आहेत.
महापालिकेने ३१ मार्च २०१७ च्या महासभेत शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरातील रस्ते बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला होता. या ठरावानुसार राज्य शासनानेदेखील निर्णय घेऊन हे रस्ते महापालिकेकडून बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात येत असल्याचा निर्णय घेतला होता. मात्र, चार वर्षे होऊनदेखील हे रस्ते नेमके मनपाच्या मालकीचे की बांधकाम विभागाचे याचा तिढा अजूनही सुटलेला नाही.
शासन निर्णयानुसार जर रस्ता पीडब्ल्यूडीकडे तर मनपाकडून दुरुस्ती का ?
शासन निर्णयानुसार हे रस्ते जर बांधकाम विभागाकडे वर्ग झाले असतील तर चार वर्षांपासून महापालिकेकडून या रस्त्यांवर डागडुजी करून लाखोंची उधळपट्टी का करण्यात आली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच जर शासन निर्णय झाल्यानंतरही महापालिकेने हे रस्ते बांधकाम विभागाकडे वर्ग केले नसतील तर मग हस्तांतरित न करण्याचे नेमके कारण काय? याबाबत मनपा प्रशासनाकडून कोणतीही माहिती दिली जात नाही.
बांधकाम विभागाने मनपाकडे पत्रव्यवहार, मनपाकडून मात्र उत्तर नाही
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका मुख्य अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार शासन निर्णय जरी झाला असला तरी मनपाने हे रस्ते बांधकाम विभागाकडे हस्तांतरित केलेले नाहीत. बांधकाम विभागाने हे रस्ते हस्तांतरित करण्याआधी या रस्त्यावरील अतिक्रमण काढून देण्याबाबत मनपाकडे पत्रव्यवहार केला होता. मात्र, मनपाने यावर कोणतेही उत्तर बांधकाम विभागाला दिलेले नाही. यासह याबाबत संयुक्तिक बैठक घेण्याबाबतदेखील पत्रव्यवहार करण्यात आला; मात्र मनपाने याकडेही दुर्लक्ष केल्याची माहिती बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे.
२० किमीच्या या रस्त्यांचा समावेश
१. शिवाजीनगर-लाकूड पेठ-कानळदा नाका - ३ किमी
२. अजिंठा चौक - टॉवर चौक - शनिपेठ - ममुराबाद रस्ता - ५.५० किमी
३. निमखेडी-दूध फेडरेशन-टॉवर चौक-आसोदाकडे जाणारा रस्ता - ६.५० किमी
४. टॉवर चौक- स्वातंत्र्य चौक - जिल्हाधिकारी कार्यालय -लांडोरखोरी - ३.२२ किमी
५. टॉवर चौक- शिवाजीनगर-लाकूड पेठ - ०.८० किमी
कोट..
महापालिकेचे रस्ते बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्याबाबतचा शासन निर्णय झाला आहे. तसेच याबाबत झालेल्या पूर्ण प्रक्रियेची माहिती घेतली जाण्याचे काम सुरू आहे. याबाबत संपूर्ण माहिती घेऊनच या निर्णयाबाबत सांगता येईल. या निर्णयाबाबत अभ्यास सुरू आहे.
- सतीश कुलकर्णी, मनपा आयुक्त