अजय पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सलग तीन वर्षांपासून पावसाच्या बदललेल्या प्रक्रियेमुळे जिल्ह्यात सलग तीन वर्षांपासून खरीप हंगाम नावालाच राहिला आहे. यंदाही तब्बल पंधरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतशिवारातील सर्वच पिकं करपली आहेत. यंदाच्या खरीप हंगामातील एकूण उत्पादनाच्या केवळ ५० टक्केच हंगाम होण्याची शक्यता आहे.
जून महिन्यात पेरण्या करूनदेखील पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी कराव्या लागल्या; मात्र दुबार पेरणी करूनदेखील पुन्हा पावसाने पाठ फिरवली असल्यामुळे आता उभ्या शेतातील सर्व पीक जळून खाक होत आहे. सोयाबीन, उडीद, मूग व मक्याच्या पिकांचे पूर्ण नुकसान झाले असून, जेमतेम उत्पादन होण्याचीच शक्यता आहे.
१ लाख हेक्टरवरील कापसालाही फटका
जिल्ह्यात सुमारे ४ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे; मात्र त्यापैकी १ लाख हेक्टर क्षेत्रावरील कापूस वाया जाण्याची शक्यता आहे. एकीकडे बागायती कापसाला कैऱ्या उगविण्यास सुरुवात होत असताना, अनेक तालुक्यांमधील कोरडवाहू क्षेत्रावरील कापसाची वाढ पूर्ण खुंटली आहे. जळगाव, चोपडा, अमळनेर, धरणगाव तालुक्यात सर्वाधिक फटका बसलेला आहे. शेतकऱ्यांना हा कापूस उपटून फेकून देण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहिलेला नाही. अनेक शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पूर्ण वाया जाण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.
केळीच्या निसण्याचा प्रक्रियेवरही परिणाम
पावसाअभावी केळीच्या बागांनादेखील फटका बसला आहे. केळीला बागायतदार शेतकऱ्यांकडून जरी ठिबकद्वारे पाणी दिले जात असले तरी घड निसण्याचा प्रक्रियेसाठी पावसाचे पाणी आवश्यक असते; मात्र पावसानेच पाठ फिरविल्यामुळे केळीच्या उत्पादनावरदेखील परिणाम होण्याची शक्यता आहे.
इतक्या क्षेत्रावरील पिकांचे होऊ शकते नुकसान
पीक - पेरणी क्षेत्र - नुकसान होण्याची शक्यता (अंदाजे)
कापूस - ४ लाख ९० हजार हेक्टर - १ लाख
सोयाबीन - २५ हजार हेक्टर - १० हजार
उडीद - २६ हजार - १४ हजार
मूग - २२ हजार हेक्टर - १० हजार
सलग तीन वर्षांपासून सोयाबीनला फटका
पेरण्यांच्या वेळेस अनेक भागात सोयाबीनचे पीक उतरलेच नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. अनेक शेतकऱ्यांनी सुरुवातीला पेरण्या केल्यामुळे त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली. २०१९ मध्ये ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. २०२० मध्येही परतीच्या पावसात सोयाबीनचे नुकसान झाले, तर यावर्षीही पावसाअभावी शेतातच सोयाबीनचे नुकसान होत आहे.
दुष्काळ जाहीर करा
पावसाअभावी जिल्ह्यातील सुमारे २ लाख हेक्टरवरील क्षेत्र धोक्यात आल्याने शेतकऱ्यांकडून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. आसोदा येथील शेतकरी किशोर चौधरी, भादली येथील मिलिंद चौधरी, आव्हाणे येथील ॲड. हर्षल चौधरी यांच्यासह तालुक्यातील शेतकऱ्यांचे पथक शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहे.