उत्तर प्रदेशातील साहू यांच्या घरात, चैत्र कृष्ण एकादशीला, एक कन्या जन्माला आली- कर्मादेवी. यथावकाश तिचा विवाह झाला. पतीचा तेलाचा व्यापार होता. कृष्णभक्तीत रमणारी कर्मादेवी, पतीच्या वाढणाऱ्या व्यापारामुळे, समाजोपयोगी कामामुळे, काहींनी राजाचे कान फुंकले.राजाला त्याचा द्वेष वाटू लागला. त्याचा तेलाचा व्यापार ठप्प करण्यासाठी, कल्पना निघाली, 'राजाच्या हत्तीला असाध्य खाजरोग झाला आहे. तो बरा होण्यासाठी तेलात औषधे टाकून, त्याला जर मनसोक्त डुंबायला दिले, तरच बरा होऊ शकतो. राज्यातील तलाव सात दिवसात तेलाने भरायला हवा, अन्यथा समस्त तेली समाजाच्या लोकांना कंठस्नान घालण्यात येईल, असे जाहीर झाले. सात दिवसात तलाव भरण्याचे काही चिन्ह दिसेना. समस्त तेली समाज चिंतीत झाला. आपल्या पतीवर, समाजावर आलेले संकट बघून, कर्मादेवीने भगवंताला साद घातली. तो हाकेला पावला. राजाचा तलाव तेलाने काठोकाठ भरला. कर्मादेवीचा जयजयकार झाला. तिची कीर्ती सर्वत्र पसरली. आज पण शिवपुरी जिल्ह्यातील नरवर गावात असलेला तलाव हा 'धर्मा तलैय्या' या नावाने ओळखला जातो.कर्मादेवीचा पुत्र अल्पायु ठरला. पतीचे निधन झाले. तिने सती जाण्याची तयारी केली. मात्र आकाशवाणी झाली, ‘तुझ्या पोटात बाळ वाढत आहे. तू सती जाऊ नको. मी तुला जगन्नाथपुरीला भेटेन.’ प्रत्यक्ष कृष्णाची आज्ञा कशी मोडणार? तिने सर्व कृष्णचरणी अर्पण करावयाचे ठरविले. एकदा अचानक, आपल्या मुलाला घेऊन ती माहेरी आली. तिथे मुलाला स्वाधीन केले आणि भगवान जगन्नाथाच्या दर्शनाला पायी निघाली. चालता चालता थकलेल्या कर्माबाईचा डोळा अति श्रमाने केव्हा लागला, ते समजलेच नाही. सकाळी जाग आली, तर ती जगन्नाथपुरीला होती. भगवंताचे दर्शनास जाण्यासाठी मंदिराच्या पायºया चढू लागली. तिचा अवतार बघून मंदिराच्या लोकांनी तिला हाकलून लावले. ती समुद्रकिनाºयावर बेशुद्धावस्थेत होती. त्यानंतर मंदिरात बघतात तो काय, मंदिरातील भगवंताची मूर्ती नाहीशी झालेली. मूतीर्चा शोध सुरू झाला. समजले की समुद्र किनाºयावर प्रचंड गर्दी जमलेली आहे. भगवान श्रीकृष्ण कर्माबाईच्या मांडीवर बसून तिच्या हाताने खिचडी खात आहे. हे पाहून, मंदिराच्या लोकांनी भगवंताची क्षमा मागितली, ‘तुम्ही हिला मंदिरात येऊ दिले नाही, म्हणून मी इथे आलो.’ यासोबतच भगवंताने कर्मादेवीला वरदान दिले, की ‘छप्पन भोग ग्रहण करण्याअगोदर, मी खिचडीचा भोग ग्रहण करेल.’ तेव्हापासून भगवान जगन्नाथाला खिचडीचा पहिला भोग असतो. कर्मादेवीच्याच शब्दात-थाळी भरके ल्याई रे खीचड़ो, ऊपर घी की बाटकी। जीमो म्हारा श्याम धणी, जीमावै बेटी जाट की।।‘बारा बलुतेदार’ या समाजघटकांमधील ‘तेली’ हा समाज महाराष्ट्र व भारतासह दक्षिण आशियातदेखील आढळतो. पूर्वीच्या काळी तेलबियांमधून तेलाचे गाळप व विक्री करण्याच्या पेशातील लोकांना ‘तेली’ या संज्ञेने ओळखले जाई. तेली समाज हिंदू तसेच मुस्लीम या दोन्ही धर्मांत आढळतो. इस्लामधर्मीय तेली यांचा उल्लेख तेली यापेक्षा ‘रोशनदार’ या नावाने केला जातो. महाराष्ट्रातील ‘ज्यू’ समाजातील, यांना ‘बेने इस्राएली’ या नावाने ओळखतात. याचा रहिवास हा कोकण किनाºयावर विशेषत: आहे. ते आपल्याकडे ‘शनिवार तेली’ नावाने परिचित आहेत. ‘शनिवार तेली’ म्हणजे त्यांच्या परंपरेप्रमाणे, हे शनिवारी तेल काढतात.सध्या ‘तेली’ ही जात ‘इतर मागासवर्गीय’ जातीत गणली जाते. वर्णाश्रमातील यांचे स्थान बघितले, तर बहुतांशपणे ते ‘वैश्य’ म्हणजे व्यापारउदीम करणारे म्हणून ते मानले जातात. राजस्थानात यांचा समाज स्वत:ला ‘क्षत्रिय’ समजतो. गुजरातमधील ‘घांची समाज’ हा तेली समाजाचाच एक भाग आहे.बंगालमध्ये व्यापारी आणि सावकार अशा सुवर्णनाबानीक, गंधबानीक, साहा सारखे ‘वैश्य’ म्हणून मानतात, राजस्थानात ते क्षत्रिय समजतात, उत्तर महाराष्ट्रात बहुतांशपणे ते आपल्या कुटुंबाचे नाव न लावता चौधरी हे आडनाव लावतात. दक्षिण भारतात यांना तेली किंवा गंडला नावाने ओळखतात. यात देवगंडला, शेट्टीगंडला, सज्जनगंडला असे प्रकार आहेत. काही आपणास क्षत्रीय आणि रेड्डीगंडला समजतात. कर्नाटकात हे गानिगा किंवा गौडा, सोमक्षत्रिय गानिगा आणि काही लिंगायत गानिगा असे परिचित आहेत. तामिळनाडूत हे वनीय चेट्टीयार, गंडला चेट्टी, गानिगा चेट्टी, चेक्कलार, चेक्कू असे ओळखले जातात. केरळात चेट्टीअर असे ओळखतात. यातील उपजाती- तिळवण, शेनवार, राठोड, सावजी, शिरभाते, गुमाने, मलिक, तिरमल, एरंडेल, साहू, लिंगायत, वद्धार, ताहीमे, जैरात, मोदी, कोंकणी, मलिक साहू, पद्मवंशी या आहेत.-अॅड.माधव भोकरीकर
भगवान जगन्नाथाला आपल्या हाताने खिचडी भरविणारी कर्मादेवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 17:17 IST