कळमसरे (ता. अमळनेर) : राजस्थानी मारवाडी समाजाचे आद्य दैवत रुणेराचारा नाथ बाबा रामदेवजी यांचा प्रकट दिन भाद्रपद शुद्ध दशमी गुरुवार, ता. १६ रोजी मोठ्या उत्साहात झाला.
या निमित्ताने आदल्या दिवशी संध्याकाळी बाबुलाल शर्मा व शोभा ओस्तवाल यांच्या रामदेव बाबा अवतारापासून समाधीपर्यंतच्या जीवनलीलावर आधारित विशाल भजन संध्या कार्यक्रम श्रीराम मंदिर चौकात झाला. सकाळी विधिवत मंत्रोच्चारात लघुरुद्र अभिषेक, महाआरती झाली. रामदेव शर्मा यांनी पौरोहित्य केले. कुंभारवाडा परिसरातील मंदिरात वर्मा परिवाराने रामदेव बाबा मूर्तीचे दुग्ध-चंदन लेपाने शाही स्नान घातले. मूर्तीला गुलाबपुष्प व वस्त्रालंकाराने सजविण्यात आले. विद्युत रोषणाई-रंगरंगोटी, सडा-रांगोळ्यांनी परिसर सुशोभित करण्यात आला. केवलचंद दीपचंद ललवाणी यांच्या वतीने महाप्रसाद झाला. यावेळी अमळनेर, धुळे, दोंडाईचे, नांदगाव, नेपानगर, जालना भडगाव, चांदवड येथून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.