सुविधा : अनुसूचित जाती -जमाती लाभार्थ्यांना डिसेंबरपर्यंत लाभ घेता येणार
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांना मिळणार लाभ
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांना वीज जोडणीसाठी महावितरणतर्फे यंदा १४ एप्रिलपासून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी खान्देशातील संबंधित लाभार्थ्यांना ६ डिसेंबर २०२१ पर्यंत अर्ज करता येणार आहे.
इन्फो :
असा घेता येईल या योजनेचा लाभ
या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थ्यांकडे आधार कार्ड व रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदारांनी वीजजोडणीसाठी अर्ज केल्याच्या ठिकाणी यापूर्वीची थकबाकी नसावी.योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने महावितरणच्या विहित नमुन्यात कागदपत्रासह ऑनलाईन अथवा ऑफलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. शासनमान्य विद्युत कंत्राटदारांकडून वीज मांडणीचा चाचणी अहवाल अर्जासोबत जोडणे गरजेचे आहे. तसेच लाभार्थ्याला ५०० रुपये इतकी अनामत रक्कम महावितरणकडे जमा करावी लागणार आहे.
इन्फो :
महावितरणकडे आलेल्या अर्जांची
आकडेवारी नाही
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मुहूर्तावर सुरू केलेल्या या जीवन प्रकाश योजनेत आतापर्यंत अनुसूचित घटकातील किती लाभार्थ्यांनी अर्ज केले आहेत, याची कुठलीही आकडेवारी सध्या महावितरणकडे उपलब्ध नसल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. तर मंगळवारी सायंकाळपर्यंतही ही आकडेवारी देण्यात आली नाही. त्यामुळे ही योजना संबंधित लाभार्थ्यांपर्यंत महावितरणतर्फे पोहचविण्यात आली की नाही, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.